Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या उपक्रमाची ‘एशियाआणि इंडिया बुक रेकॉर्ड’ मध्ये नोंद

पुणे  : भारती विद्यापीठाच्या वतीने, “आम्ही भारती’य” या संकल्पने अंतर्गत, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा  रौप्यमहोत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.  भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या “स्वराज्य, स्वातंत्र्य, सुराज्य या मोहिमेची ‘एशियाआणि इंडिया बुक रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आल्याचे प्रमाणपत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

“सर्वांसाठी एकच पृथ्वी’ या ‘युनेप’ने घोषित केलेल्या पर्यावरण सूत्रात या मोहिमेची मांडणी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र संघाने सुनिश्चित केलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स-२०३० आणि २०७० पर्यंत भारत कार्बन-उत्सर्जन-मुक्त करण्याचे देशाने जगाला दिलेले आश्वासन,नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी मध्यवर्ती मानून हा उपक्रम राबवला गेला.  माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. आजादी का अमृत महोत्सव, भारती विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, केंद्र सरकारचा पुरातत्व विभाग, तेर पोलिसी सेंटर, स्मार्ट क्लाऊड कॅम्पस नेटवर्क, युनेप थीम-२०२२, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. डॉ. सुहास मोहिते मोहिमेचे मुख्य समन्वयक होते.

या उपक्रमात जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील ७५ गड-किल्ल्यांच्या वर एकाच वेळी आरोहण, बीज आणि वृक्षारोपण करण्यात आले.  महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि संस्थेचे स्नेहांकित त्यात सहभागी झाले होते. भारती विद्यापीठातील ५० सायकलस्वारांनी “सिंहगड ते रायगड” असा १४२ किलोमीटर प्रवास करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. याचवेळी भारती विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विविध १४ विद्याशाखातील, देशातील सुमारे १३ राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशातील ७५ विद्यार्थिनीनी सिंहगड आरोहण करून, नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले आणि देशाच्या  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading