Thursday, May 14, 2026
BusinessLatest News

पाय ग्रीन ईनोव्हेशन्सला मिळाले भारतातील फिल्टरलेस तंत्रज्ञानासाठीचे पेटंट

पुणे :: उदयोन्मुख क्लीनटेक स्टार्ट अप्सपैकी एक असलेल्या पाय ग्रीन ईनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडला कार्बन कटर या फिल्टरलेस तंत्रज्ञानासाठी भारताचे पेटंट मंजूर करण्यात आले आहे. पेटंट मिळालेले पाय ग्रीन कार्बन कटर तंत्रज्ञान डिझेल जनरेटर आणि अवजड वाहनांसाठी रेट्रोफिट उपकरणे तयार करण्याकरता वापरले जाते. पाय ग्रीन ईनोव्हेशन्सने २०१७ मध्ये त्याच्या भारतीय  पेटंटसाठी अर्ज दाखल केला. कंपनीने स्त्रोत आणि वातावरणीय हवेतून कण उत्सर्जन (PM 2.5/PM 10) कमी करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाय विकसित केले आहेत. कंपनीकडे आधीपासूनच  यूएसए, चीन, यूके, युरोपियन युनियन आणि सिंगापूरमध्ये कार्बन कटरची पेटंट आहेत. हे पेटंट पाय ग्रीन इनोव्हेशन्सना व्यवसायांना या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या संधी सादर करण्यास सक्षम करेल. त्यामुळे स्त्रोतावरील उत्सर्जन कळण्यास मदत होईल आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देईल.

पाय ग्रीन कार्बन कटर हे पूर्णपणे स्वयंचलित, फिल्टरलेस सोल्यूशन आहे जे डिझेल जनरेटर, जड वाहने आणि औद्योगिक बॉयलरवर ७०% पेक्षा जास्त पार्टिक्युलेट मॅटर पकडण्यासाठी स्थापित केले जाऊ शकते. कंपनीचे ऑटो, हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी, पोर्ट्स, एसईझेड, हेवी इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इत्यादी प्रमुख क्षेत्रांमध्ये अनेक ग्राहक आहेत. पाय ग्रीनच्या कार्बन कटर सोल्यूशनला जागतिक स्तरावर पोलंड मध्ये आयोजित परिषद स्मोगॅथॉन २०१८ मध्ये हवा शुद्धीकरणासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान म्हणून ओळखले गेले आहे.

यावर भाष्य करताना पाय ग्रीन इनोव्हेशन्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इरफान पठाण म्हणाले, “पाय ग्रीनच्या कार्बन कटर तंत्रज्ञानासाठी ही मान्यता मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण उपक्रम कसे उपयुक्त ठरू शकतात याविषयी संपूर्ण टीमसाठी ही प्रेरणादायी मान्यता आहे. स्वच्छ हवा सर्वांना उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे आणि भारताच्या पेटंटमुळे आम्ही आमच्या ध्येयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.”

पाय ग्रीन इनोव्हेशन्सचे सह संस्थापक आणि मुख्य शोध अधिकारी  रिजवान शेख म्हणाले, “महाविद्यालयीन दिवसांपासूनच नावीन्यपूर्णतेद्वारे जागतिक व्यासपीठावर भारताला अभिमानास्पद बनवण्याचे माझे स्वप्न होते. पाय ग्रीन कार्बन कटर हे पर्यावरणाच्या क्षेत्रातील नवीन संशोधनासह काही मूलभूत वैज्ञानिक संकल्पनांचे मिश्रण आहे. संपूर्ण युरोप युनियन, यूएसए, सिंगापूर, चीन आणि ब्रिटनमध्ये पेटंट मंजूर झाल्याचे समाधान होते परंतु भारतात पेटंट मिळणे हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे. पुढे जाऊन, माझी टीम आणि मी भारतातील हवा स्वच्छ करण्यात आणि श्वास घेण्यासाठी ही जागा अधिक चांगली बनवण्याकरता योगदान देत राहू.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading