बँड पथकालातील वादकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप
पुणे : जवळपास 15 महिन्यांच्या काळानंतर बँड पथकातील ज्येष्ठ कलाकार गणपत रंगनाथ भारस्कर यांच्या क्लॅरिनेट वादनातून ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा..’च्या उमटलेल्या सुरांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात चैतन्याची लहर उमटली.
निमित्त होते ते स्त्री आधार केंद्र-पुणे, प्रथम संस्था-मुंबई आणि उपसभापती कार्यालय, मुंबई यांच्या वतीने अन्नधान्य किट वाटप कार्यक्रमाचे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पुण्यातील बॅन्ड पथकातील 260 वादकांना प्रातिनिधीक स्वरूपात आज अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन संवाद, पुणे या संस्थेने केले आहे.
संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेवक विजय देशमुख, पुणे बँड पथकाचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोऱ्हे म्हणाल्या, आनंदाच्या क्षणी जसे संगीत स्फूर्ती देते त्याच बरोबरीने संकटाच्या काळातून बाहेर पडण्यासाठी आणि आयुष्याला उभारी देण्यासाठी संगीताच्या माध्यमातून शक्ती मिळते. कोरोनामुळे अनेकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत योग्य व्यक्तिंपर्यंत मदत पोहोचणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अनेक वंचित घटकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. बँड पथकातील कलाकारांच्या लसीकरणावर भर द्यावा, जेणे करून भविष्यात कार्यक्रमांच्या आयोजनातील आणि कलाकारांच्या सहभागातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. लसीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही गोर्हे यांनी या वेळी दिली.
सुनील महाजन म्हणाले, शहरातील 16 बँड पथकातील 260 कलाकरांना अन्नधान्याचे किट देण्यात येत आहे. पुण्यात जवळपास 250 ते 300 वादक आहेत. या वादकांना गेल्या दिड वर्षापासून काम नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निलमताई गोर्हे यांच्या मदतीने अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येत आहे.
व्यवसाय सुरू करण्याची शासनाच्या वतीने परवानगी मिळावी, अशी विनंती इकबाल दरबार यांनी गोर्हे यांच्याकडे केली. नगरसेवक विजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. संजय मोरे यांनी आभार मानले.
