देहविक्री करणाऱ्या महिलांना १०० धान्याचे किट; पार्वती चव्हाण सोशल फाऊंडेशनचा पुढाकार
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठे संकट महाराष्ट्रासमोर उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढत परिस्थितीशी लढा देण्याचा प्रयत्न बुधवार पेठेतील देहविक्रिय करणा-या व देवदासी महिला देखील करीत आहेत. त्यांना मदतीचा हात देण्याकरीता पार्वती चव्हाण सोशल फाऊंडेशनतर्फे श्रीरामनवमीनिमित्त महाभंडारा रद्द करुन २०० धान्याचे किट देण्याच्या उपक्रमाला प्रारंभ झाला.
पार्वती चव्हाण सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्षे कसबा पेठेमध्ये श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जातो. श्रीरामनवमीनिमित्त महाभंडारा देखील केला जात असे, त्यामध्ये शेकडो भक्त महाप्रसादाचा लाभ घेत होते. मात्र, ही परंपरा यंदा सलग दुस-या वर्षी खंडित झाली असून कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढयात बुधवार पेठेतील महिलांना १०० धान्याच्या किटची मदत देण्यात आली.
यावेळी शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, फाऊंडेशनचे गणेश चव्हाण, पीयुष शाह, सुरेश कांबळे, किशोर पवार, हनुमंत शिंदे, अमित दासानी, स्वाधार संस्थेच्या सुवर्णा पोटफोडे, सिद्धार्थ शिंदे, अंगद दळवी, शंकर डिंबर आदी उपस्थित होते.
गणेश चव्हाण म्हणाले, बुधवार पेठेतील महिलांकरीता पहिल्या टप्प्यात श्रीरामनवमीच्या निमित्ताने ५० किट देण्यात आले. त्यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, मीठ, मसाले, खोबरेल तेल, टूथ पेस्ट, बिस्किटे आदी साहित्याचा समावेश आहे. दुस-या टप्प्यात बुधवार पेठेतील महिलांना ५० व पौडजवळील कातकरी वस्तीवर १०० किट देण्यात येणार आहेत.
ते पुढे म्हणाले, दरवर्षी कसबा पेठ फडके हौद येथे साज-या होणा-या उत्सवाला ५०० हून अधिक भक्त येतात. त्यांची महाप्रसादाची सोय पार्वती चव्हाण या स्वत: करतात. तसेच त्यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जातात. मात्र, यंदा या परंपरेला दूर ठेवत ही मदत दिली आहे. प्रभु रामाने जसे लंकेमध्ये जाण्याकरीता सेतू बांधला, त्यामध्ये अनेकांनी खारीचा वाटा उचलला. तसेच या कोरोनाविरुद्धच्या लढयामध्ये फाऊंडेशन खारीचा वाटा देत आहे.
