Thursday, June 18, 2026
PUNE

‘राम कथा माला’ पुस्तकास रसिकांचा प्रतिसाद !

पुणे : रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारे ‘रामकथामाला’ हे पुस्तक, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले असून दिपाली पाटवदकर लिखित या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे . मागील महिन्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते . विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे ही माहिती देण्यात आली .

राम नवमीच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक विवेकानंद केंद्राच्या प्रकाशन विभागात उपलब्ध करण्यात आले असून त्यासाठी वाचकांना vkmpv@vkendra.org येथे संपर्क साधता येईल .

पुनि पुनि कितने हो सुने सुनाये, हिय की प्यास बुझत ना बुझाये।

सीता राम चरित अति पावन, मधुर सरस और अति मन भावन।।

कितीही वेळा ऐकलं, वाचलं, बघितलं तरी ज्याची गोडी कमी होत नाही. एक मधुर रस – साखर आणि त्याची नानाविध पक्वान्न व्हावीत तशी रामायणाची कथा. त्यातल्या अतीव सच्चेपणामुळे आणि मानवी आदर्शाच्या उच्चतम मूल्यांमुळे ती आत्म्याला सुखदायक आहे. ज्यामध्ये मानवाने आपलं अंतिम प्रतिबिंब बघावं अशी ती कथा आज विविध रुपात आणि माध्यमांत प्रकट झाली आहे. प्रभू रामाबद्दल ‘मंगल भवन अमंगल हारी’ ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे त्याची अभिव्यक्ती अशी सर्वदूर पसरली आहे.

रामकथामाला या पुस्तकातून देशोदेशीच्या रामकथेची ओळख होते. भारतीय संस्कृतीची शिकवण देणारी रामकथा केवळ भारतातच नाही तर बाहेरील अनेक देशात पूज्य आहे. कोणी म्हणेल या कथेतला मर्यादापुरुषोत्तम राम हा आमच्या देशाचा नायक आहे! तर कोणी सांगेल श्रीरामाचे शब्द आमच्या देशाचे ब्रीदवाक्य आहे! कोण म्हणेल त्याची कथा आमच्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे! आणखी कोणी अभिमानाने सांगेल की त्याचे नाव आम्ही आमच्या राजाला दिले आहे, त्याच्या राजधानीचे नाव आम्ही आमच्या राजधानीला दिले आहे! कोणी गर्वाने सांगेल की त्याची कथा आम्ही वाचतो – ऐकतो! कोणी आनंदाने गर्जेल – आम्ही रामायण सांगतो – गातो! कोणी सांगेल आम्ही रामाची कथा नाट्यातून सदर करतो, नृत्यातून सदर करतो! कोणी सांगेल आम्ही रामकथा शिल्पात कोरली आहे! तर आणखी कोणी सांगेल आम्ही कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातून रामायण सादर करतो!

हे सांगणारे सगळेजण केवळ भारतीय नाहीत, भारताच्या बाहेरचे पण आहेत. जपानी, इंग्रजी, फार्सी, डच बोलणारे आहेत. जैन, बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमान धर्मीय आहेत. गायक, नर्तक, नट, चित्रकार, शिल्पकार आहेत. अभिजात कला जाणणारे आहेत तसेच लोककला जाणणारे पण आहेत. शहरी आहेत, खेडूत आहेत आणि वनवासी पण आहेत. पुरुष आहेत आणि स्त्रिया पण आहेत. कवी, साहित्यिक, इतिहासकार आणि संशोधक सुद्धा आहेत. प्राचीन काळातील लोक आहेत, मध्ययुगीन लोक आहेत आणि अर्वाचीन काळातील लोक सुद्धा आहेत.

या सगळ्यांना रामायणात असे काय मिळाले की त्यांना रामकथा गात नाचावेसे वाटले? कोण आहेत या विविध संस्कृती? कुणाकुणाची उपजीविका रामकथेवर चालते? रामकथेचा प्रचार कुठेकुठे झाला आहे? हे सर्व जाणण्यासाठी रामकथामाला हे पुस्तक आवर्जून वाचावे!

रामकथेच्या दिग्विजयाचे साकार रूप घेऊन रामकथामला हे पुस्तक राज्यपाल श्री. कोश्यारीजींच्या हस्ते प्रकाशित झालं आहे. दिपाली पाटवदकर ह्यांनी ‘रामकथामाला’ ह्या पुस्तकरूपाने ह्या सर्व रामायण अभिव्यक्तीचा परिचय करून देणारे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. ह्या मध्ये विविध रामायणावरील निरुपण आणि सोबत रंगीत प्रसिद्ध चित्रे, शिल्पांची चित्रे ह्यांनी नटलेले हे पुस्तक आहे. रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारे हे पुस्तक, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले असून, या पुस्तकाला श्री निलेश नीलकंठ ओक यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. दिपालीचं पुस्तक केवळ माहिती न राहता एक स्वतंत्र तात्त्विक भूमिकाही मांडतं कारण त्यामध्ये प्रत्येक रूपाचं वैशिष्ट्य आणि फरकही आहे. जरूर संग्रही असावे असे पुस्तक, फोरकलरमध्ये असूनही अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading