गणेश कला क्रीडा मंच येथे १०० बेडचे हॉस्पिटल
पुणे : महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे १०० बेडच्या हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नगरसेवक आबा बागूल यांच्या पुढाकारातून या १०० ऑक्सिजनच्या बेडचे काम साकारत आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे १०० बेडच्या हॉस्पिटलच्या कामासाठी डॉ. ऋतुपर्ण शिंदे, डॉ. निखिल हिरेमठ, डॉ. संदीप पाटील, डॉ. अश्विनी जोशी यांच्या माध्यमातून जवळपास १०० कर्मचारी महापालिका आणि डॉक्टरांच्या संयुक्त विद्यमाने १०० बेडच्या कोविड हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याबाबत काम करणे गरजेचे होते. महापालिकेची अत्यंत मोक्याची असणारी स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंचाची जागा आहे या जागेचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा या भावनेने १०० ऑक्सिजन बेडचे नियोजन करण्यात येत आहे. या ठिकाणी सध्या टॉयलेट, बाथरूम, लायटिंगचे काम सुरू आहे. येत्या चार दिवसांत हे काम पूर्ण होणार असून रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटल सज्ज होईल, असे नगरसेवक आबा बागूल यांनी सांगितले. या ठिकाणी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल, महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही भेट दिली आहे.
या ठिकाणी रुग्णांना बेडची सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार आहे. महापालिका व विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन हे हॉस्पिटल चालविण्यात येत आहे. अशाच प्रकारचे काम शहरातील सर्वच लोकप्रतिनिधींनी केल्यास रुग्णांच्या अडचणी कमी होतील आणि त्यांना सहज बेड उपलब्ध होतील. त्यामुळे सर्वांनी अशी सेवा सुरू करावी असे आवाहनही बागूल यांनी केले.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे येथील नगरसेवक तसेच शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी अथक प्रयत्न करून ८० खाटांचे रुग्णालय उभे केले आहे. पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन नगरसेवक आहेत. यातील वसंत मोरे यांच्याकडे पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी तर नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी आहे.
पुणे शहरात गेल्या वर्षीपासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. मनसेकडून अभिनव पद्धतीने आंदोलने करून या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. पुणे शहरात अशाप्रकारे नगरसेवकांनी जर खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशाप्रकारे ऑक्सिजन बेड रुग्णालय उभारल्यास पुणे शहरातील कोरोनाची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
