परिवर्तन – द अॅक्ट ऑफ काईंडनेस राज्यस्तरीय स्पर्धा
पुणे : माणसामध्ये दयाभाव असणे फार महत्वाचे आहे. समाजात वावरताना सर्वांशी प्रेमाने वागणे व मदत करीत रहाणे, अशी शिकवण प्रत्येकाला लहानपणापासून मिळायला हवी. त्यामुळे लहान मुलांमध्ये दयाभाव व सत्कृत्य करण्याची भावना जागृत करण्याकरीता पुण्यातील जैन सोशल ग्रुप युथ पुणे सेंट्रल तर्फे परिवर्तन – द अॅक्ट आॅफ काईंडनेस या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष प्रितम भटेवरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला पवन भंडारी, धीरज ओस्तवाल, आनंद चोरडिया आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा ४८ दिवसांची असून वयवर्षे ७ ते ९, ९ ते १२ आणि १२ ते १५ या तीन वयोगटांत होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाने दिवसातून एकदा एक चांगले काम म्हणजेच सत्कृत्य करायचे आहे. त्याची नोंद ग्रुपतर्फे दिलेल्या वहीमध्ये स्वहस्ताक्षरामध्ये करायची आहे. तसेच ते आॅनलाईन पद्धतीने अपलोड देखील करायचे आहे. सहभागी स्पर्धकांना बक्षिसे (रिटर्न गिफ्ट) देण्यात येणार आहेत. तसेच, विजेत्या स्पर्धकांना तब्बल २ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके मिळणार आहेत. जैन सोशल ग्रुपस् पुणे परिवार आणि जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल महाराष्ट्र रिजन यांच्या सहयोगाने स्पर्धा होत असून प्रकाश धारीवाल माणिकचंद ग्रुप व सुहास खाबिया यांचे सहकार्य मिळाले आहे.
प्रितम भटेवरा म्हणाले, लहान वयातच मुलांमध्ये प्रेमभाव, करुणा आणि समाजामध्ये चांगले काम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी, याकरीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या वहीमध्ये मुले आपण केलेल्या चांगल्या कामाची माहिती लिहिणार आहेत, ती आयोजकांतर्फे परत घेतली जाणार नाही. भविष्यात मोठे झाल्यावर आपण केलेले सत्कृत्य त्यांच्या आठवणीत रहावे, हा देखील उद्देश आहे.
दिनांक २४ एप्रिल २०२१ पर्यंत स्पर्धकांना www.jsgypc.org यावर नोंदणी करता येणार आहे. महावीर जन्मकल्याणक च्या निमित्ताने दिनांक २५ एप्रिल रोजी स्पर्धेचे उद््घाटन होणार आहे. तर, दिनांक १ मे ते १८ जून दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २७ जून रोजी होणार आहे. सर्व कार्यक्रम व स्पर्धा आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. तरी मुला-मुलींनी मोठया संख्येने सहभागी व्हावे.
