Saturday, June 6, 2026
MAHARASHTRAPUNE

शिवनेरी स्मारक समितीतर्फे शिवनेरीवर साधेपणाने शिवजयंती उत्सव

पुणे : श्री शिवनेरी स्मारक समितीतर्फे किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला बुधवार, दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी ७ वाजता शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ शिवजन्म, पाळणा व धार्मिक कार्यक्रम सर्व नियमांचे पालन करुन होणार आहेत.  उत्सवाचे यंदा ४२ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली. 


कै.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै.शाहीर किसनराव हिंगे यांनी १९८० सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केलेला आहे. बुधवारी (दि.३१) शिवजन्मस्थळावर उत्सवाची सुरूवात श्री शिवाई देवीच्या महापूजेने होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने व संगीता रासने यांच्या हस्ते श्री शिवाई देवीची महापूजा होणार आहे. 
त्यानंतर सकाळी ९ वाजता गडावरील श्री शिवजन्म स्थळावर शिवजन्म, पाळणा व सुंठवडा वाटप त्यानंतर ध्वजारोहण होईल. तसेच राजमाता जिजाबाई व बालशिवाजी यांच्या पुतळ्याचे पूजन, शिवकुंजात शिवजागर व गोंधळ सादर होऊन कार्यक्रम संपन्न होईल. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे कलावंत शाहीर गणेशदादा टोकेकर, होनराज मावळे व सहकारी शिवजागर आणि पारंपारिक गोंधळ सादर करतील.

आपापल्या घरावर भगवी पताका उभारुन करावी शिवजयंती साजरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत श्री शिवजयंती उत्सव संपन्न होत असून शिवभक्तांनी गडावर येण्याचा आग्रह धरू नये. आपल्या परंपरेला खंड न पडू देता धार्मिक सर्व परंपरा जपत विधिवत पूजन व हा सोहळा संपन्न होणार आहे. सार्वजनिक आरोग्याचा विचार करता श्रद्धायुक्त अंत:करणाने आपापल्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा प्रतिमा व हिंदवी स्वराज्याचे प्रतीक म्हणून भगव्या ध्वजाचे पूजन करावे. तसेच आपल्या घरावर भगवी पताका उभी करावी, असे आवाहन शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading