वंचित बहुजन आघाडीच्या सभासद नोंदणी मोहिमेचे ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते उदघाटन
मुंबई,दि. २५ – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात सभासद नोंदणी मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेचे उदघाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, राज्य कमिटीचे निमंत्रित सदस्य अशोक सोनोने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः पक्षाची हितचिंतक सभासद फी भरून सभासदत्व मोहिमेचं उदघाटन केले. बाळासाहेब आंबेडकर यांना ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांच्या हस्ते ‘हितचिंतक सभासद प्रमाणपत्र’ देण्यात आले. तसेच डॉ. अरुण सावंत व रेखा ठाकूर यांनी सुद्धा हितचिंतक सभासद फी भरून सभासदत्व घेतले. बाळासाहेबांच्या हस्ते त्यांना सभासद प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य जनतेला पक्षाच्या सभासद मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
सभासद नोंदणी मोहिमेचे प्रमुख व पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सभासद नोंदणी मोहिमेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ‘ही सभासद नोंदणी मोहीम पूर्णपणे ऑनलाईन चालवली जाणार असून http://www.vbabharat.org या वेबसाईटवर Membership पेजवर क्लिक करून फॉर्म व सभासद नोंदणी फी भरायची आहे. त्यानंतर तात्काळ आपल्या इमेलवर सभासद प्रमाणपत्र व पावती पाठवली जाईल.’ अशी माहिती राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
