Thursday, September 3, 2026
MAHARASHTRA

परभणी – टाकळीच्या नितीन पुके यांचे प्रतिकुल परिस्थितीत UPSC परीक्षेत यश….

परभणी, दि. 19 – तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील नितीन गंगाधर पुके यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत यश संपादन करत लक्ष वेधून घेतले आहे.

नितीन यांचे वडील गंगाधरराव पुके हे परभणीत होमगार्ड म्हणून कार्यरत आहेत. तसेच गावात ते शिवणकामही करतात. अल्पभूधारक असलेल्या पुके कुटूंबातील नितीन यांचे प्राथमिक शिक्षण टाकळी कुंभकर्णच्या जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. पाचवी ते दहावी बालविद्या मंदिर व अकरा, बारावीचे शिक्षण नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात झाले आहे. बारावीनंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तसेच नितीन यांनी दोनवर्ष मुंबई येथे लोढा ग्रुपमध्ये नोकरी केली. मात्र, लहाणपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलेल्या नितीन यांनी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. त्याबरोबर सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्राप्त करीत दिल्लीत अभ्यास सुरू केला. 2019 मध्ये दिलेल्या युपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल घोषित झाला. त्यात नितीन यांनी यश पटकावले आहे. त्यामुळे नितीन यांना दिल्लीत सेवा बजावण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र, या निकालातून पाहिजे ती रँक न मिळाल्याचे शल्य नितीन यांनी व्यक्त केले. पुन्हा नव्याने युपीएससी परीक्षा देत लहाणपणापासून उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण करणारच असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत नितीन यांनी मोठे यश संपादन केल्याचा आनंद टाकळी वासियांनी व्यक्त केला. विशेषतः नितीन यांचा ग्रामस्थांतर्फे नुकताच सत्कार केला. यावेळी रामकिशन देशमुख, कैलास खराबे, विष्णू बोडखे, सुरेश तळेकर, यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading