Sunday, October 25, 2026
MAHARASHTRAPUNE

स्वातंत्र्य चळवळीचा पहिला उद्गाता यशवंतराव होळकर – हरी नरके

पुणे : एखाद्याची आरती ओेवाळणे, उद्दातीकरण करणे अथवा एखाद्याला शिव्या घालणे म्हणजे इतिहास नव्हे. इतिहासाचे कोठलेच पुस्तक अंतिम नसते. उत्तर पेशवाईत जे वर्तन घडले ते वास्तव लोकांसमोर मांडावे लागेल. शिवाजी महाराज-यशवंतराव होळकर हे द्रष्टे नेते, अत्यंत शूर योद्धा-लढवय्ये होते. या राजांना दीर्घायुष्य मिळाले असते तर भारताचा इतिहात बदलला असता. यशवंतराव होळकर हे शत्रूनेही उल्लेख करावा, गौरव करावा असा राजा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले.

महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानच्या वतीने द अनसंग हिरो ऑफ इंडिया – महाराजा यशवंतराव होळकर या इतिहास संशोधक व ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनावणी लिखित इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गोपिचंद पडळकर यांच्या हस्ते बुुधवार, दि. 6 जानेवारी रोजी झाले.  त्यावेळी प्रा. नरके बोलत होते. प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश खाडे या वेळी उपस्थित होते. पुस्तकांची समाजाला गरज वाटत नाही. राज्यकर्त्याला काय आवडते, काय आवडत नाही याकडे पाहून लोकं जगत असतात हे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.

डॉ. विकास महात्मे म्हणाले, इंग्रजीत लिहिलेले बाहेर जाते आणि बाहेरून पुन्हा भारतात आले की मग ते मोठे होते ही आजची परिस्थिती आहे. ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास आपल्याला अभ्यासक्रमात शिकवला जातो. पण या पुस्तकात जे लिहिले आहे ते वाचून आपला इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आरक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले की, आपण त्याविषयी लढा देतच आहोेत. आपल्याला काही मिळाले नाही, फायदा नाही असा समज आहे; परंतु प्रत्यक्षात सर्व माध्यामांतून याविषयी दखल घेतली जात आहे. पाठपुरावा चालू ठेवला तर अनेक चांगल्या योजना समाजापर्यंत पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यशवतंराव होळकरांचा इतिहास नवीन पिढीला कळला तर युवकांमध्ये स्फूर्ती निर्माण होईल, त्यांना कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. सरकारने इतिहासातील दुर्लक्षित क्रांतिकारकांच्या वास्तूंचे जतन केले पाहिजे, त्यांचे स्मारक व्हायला पाहिजे यासाठी तसेच अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी नमूद केले. पुस्तके दीर्घकाळ स्मरणात राहतात, पुस्तकांच्या माध्यमातून तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अभ्यास होण्यास उपयोग होतो. भारतीय राजनितीचा अभ्यास परदेशांत जास्त होत पण आपल्या देशात कमी होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

सुरुवातीस संजय सोनवणी यांनी पुस्तक लिहिण्यामागची त्यांची भूमिका उलगडून सांगितली. साधनांची कमतरता हा इतिहास लेखनात फार मोठा अडथळा असल्याचे सांगून ते म्हणाले, भारताला इतिहासच नाही, इतिहास म्हणून ज्या गोष्टी समाजापुढे आलेल्या आहेत या बर्‍याचशा दंतकथा आहेत. ज्या राजाला परदेशात शूर योद्धा, स्वातंत्र्य लढ्याचा जनक म्हणून ओळखले जाते त्याला भारताच्या इतिहासात ओळखही नाही. तेव्हा या कृतघ्नांच्या देशात कृतज्ञतेची ज्योत पेटवावी म्हणून या पुस्तकाचे लेखन इंग्रजी भाषेत केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी हे पुस्तक 250 विद्यापीठांमध्ये पाठविले जाणार असल्याचे सोनवणी यांनी या वेळी जाहीर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचान महेश गजेंद्रगडकर यांनी केले तर डॉ सुनिल धनकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading