Tuesday, June 16, 2026
PUNETOP NEWS

अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या स्वर्गीय स्वराविष्कारात न्हाऊन निघाले पुणेकर रसिक

पुण्यातील रागसंगीताची पहिली खुली मैफल

पुणे : 10 महिन्याच्या विरहानंतर कलाकार आणि रसिकांना गोखले इन्स्टिट्यूट येथे निसर्गरम्य वातावरणात ज्ञानवृक्षाच्या साक्षीने मिळालेला पुनर्भेटीची निखळ आनंद, जयपूर-अत्रौली घराण्याच्या समृद्ध परंपरेतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या स्वर्गीय स्वरांची अनुभूती, सहकलकारांची लाभलेली सुयोग्य साथ, वातावरणातील सुखद गारवा असा अवर्णनीय संगम जुळून आला तो प्रभातस्वर या प्रभातकालीन रागमैफलीने! उत्तरोत्तर खुलत गेलेली ही मैफल रसिकांना नववर्षातील सांगितिक भेट देऊन गेली.

प्रतिथयश कलाकारांचे गायन आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद अशा दुहेरी संयोग ‘प्रभातस्वर’ या मैफलीत जुळून येतो. पण गेल्या वर्षभरात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पुणेकर रसिकांना या मैफलींचा आनंद घेता आला नाही. पुणेकर रसिकांची नव्या वर्षाची सुरुवात सांगितिक व्हावी या उद्देशाने गायिका अपर्णा केळकर यांनी स्वानंदी क्रिएशनद्वारे या मैफलीस पुनश्च सुरुवात केली. डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या साथीला भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), ऋतुजा लाड आणि श्रुती अभ्यंकर (तानपुरा व स्वरसाथ) होते. कलाकारांची लॉकडाऊन नंतरची ही पहिलीच खुली मैफल होती.

डॉ. भिडे-देशपांडे यांनी आपल्या मैफलीची सुरुवात वही जाओ बालम जीन संग, हमसे ना बोलो बालमा या रामकली रागातील स्वरचित बंदीशीने केली. चनक बुंद या हिंडोल रागातील बंदिशीला जोडून पंडित बबनराव हळदणकर रचित द्रुत तराणा सादर करून कार्यक्रमाच्या पूर्वार्धात रंगत आणली. मैफलीच्या उत्तरार्धात त्यांनी सादर केलेल्या गुजरी तोडीतील पारंपरिक जियु मोरा चाहे पिया मिलनको या बंदिशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. पंडित शंकर अभ्यंकर यांनी रचलेल्या बोलता जा दिल खोलता जा ही द्रुत लयीतील रचना रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. मैफलीचा समारोप मंगल भैरव रागातील मध्य लयीतील अकरा मात्रांच्या रुद्र तालातील बंदिशीने केला. यात प्रभु तुम पालनहारा आणि जागो रे जागो भयी प्रभात या रचनांचे भावपूर्ण सादरीकरण केले. या दोन्ही रचना स्वरचित होत्या. जयपूर-अत्रौली घराण्याच्या समृद्ध परंपरेतील समर्थ, प्रगल्भ दुवा असलेल्या, कसदार सूर, बुद्धी आणि रंजकतेचा सुरेख संगम, गाण्यातील चैतन्य अशा वैशिष्ट्यांनी नटलेली डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची प्रभातस्वर मैफल रसिकांच्या अखंड स्मरणात राहील.
दहा महिन्यांच्या कालखंडानंतर पहिल्या खुल्या मैफलीबद्दल बोलताना डॉ. भिडे-देशपांडे म्हणाल्या, असा माहोल दहा महिन्यांत अनुभवायला मिळालेला नाही. प्रत्यक्ष भेटीचा आनंद कलाकार आणि रसिकांना कुठल्याही व्हर्च्युअल भेटीतून मिळत नाही. प्रत्यक्ष भेटीतून जे टिपता येते, शिष्याला गुरुकडून आणि गुरुलाही शिष्याकडून मिळवता येते. सहकलाकाराकडून जी देवाण-घेवाण होते ते समाधान, तो आनंद व्हर्च्युअल मैफलीतून मिळत नाही. मैफलींसाठी व्हर्च्युअल माध्यम फारसे उपयोगी ठरत नाही. त्यामुळे या माध्यमांचा मी मैफलीसाठी किंवा विद्यादानासाठी वापर केला नाही. नवीन बंदिशींच्या रचनांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, रागाचे स्वरूप गुरूंनी जसे शिकवले तसे शिष्य टिपतो, त्यात बुडून जाताना, काहीतरी शोधताना, खोदताना अचानकपणे काहीतरी गवसते, त्यावेळी नवीन बंदिश बांधली जाते. बंदिश बांधणे हे माझ्याकरता उमलून येण्याची प्रक्रिया आहे. मंजिरी धामणकर यांनी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना बोलते केले.

मैफलीच्या आयोजनाविषयी गायिका अपर्णा केळकर म्हणाल्या, अभिजात संगीताच्या क्षेत्रात प्रात:कालीन रागांच्या मैफलीची उणीव प्रकर्षाने जाणवल्यामुळे स्वानंदी क्रिएशन पुणेने रसिकांसाठी 2019 मध्ये प्रभातकालीन राग संगीताची मैफल आयोजित करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षात पाच मैफलींचे आयोजन करण्यात आले त्यात प्रतिथयश कलाकारांनी हजेरी लावली. गेले वर्षभर ही मैफल कोरोना संकटामुळे होऊ शकली नाही. पण या वर्षापासून मैफलींचे नियमित आयोजन केले जाणार आहे.

कलाकारांचे स्वागत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाच्या माजी अध्यक्षा, सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, एरा फुडस्चे देवेंद्र राक्षे, गंगोत्रीचे गणेश जाधव, राजेंद्र आवटे आणि संदिप चिपळूणकर यांनी केले. शशी व्यास, सुधीर निरगुडकर, पंडित रामदास पळसुले, माधव वझे, अभिनेता वैभव मांगले आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading