अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
पुणेः- केवळ प्रकाशकांसाठी असलेल्या आणि महाराष्ट्रातील एकमेव असा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारांची घोषणा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे करण्यात आली आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 2019 सालचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून करोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन लवकरच पुरस्कार वितरण सोहळा आयोजीत करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी कळविले आहे.
उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारांमध्ये ललित विभागात विजय पाडळकर लिखीत आणि अभिजीत प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘घंटेवरले फुलपाखरु’ या पुस्तकास प्रथम, रेखा बैजल लिखीत दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘महावस्त्र’ या पुस्तकास द्वितीय, तर तनुजा ढेरे लिखीत डिंपल प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मंतरलेली उन्हे’ या पुस्तकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. ललितेतर विभागात सरिता आवाड लिखित राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘हम रस्ता नाकारताना’ या पुस्तकास प्रथम, डाॅ. आशुतोष जावडेकर लिखित आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘वा! म्हणताना…’ या पुस्तकास द्वितीय, तर त्र्यं.वि. सरदेशमुख लिखीत आणि माैज प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘नट, नाटक आणि आपण’ या पुस्तकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे.
संदर्भ विभागात डाॅ. सुरेश हावरे लिखीत नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘साईसेवा’ या पुस्तकास प्रथम, गोपाळ चांदोरकर लिखीत आणि बुक मार्क पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘रायगड बालेकिल्ला’ या पुस्तकास द्वितीय, तर मनिषा बाठे लिखीत आणि समर्थ मिडिया सेेंटर प्रकाशित ‘रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट’ या पुस्तकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. उपयुक्त आणि छंद विषयक विभागात डाॅ. विठ्ठल कामत लिखीत आणि माय मिरर पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित ‘उद्योजक मी होणारच’ या पुस्तकास प्रथम, दिपक निलकंठ बिचे लिखित आणि योशोदिप पब्लिकेशतर्फे प्रकाशित ‘करियरच्या दिशा’ या पुस्तकास द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे.विज्ञान विषयक विभागात अतुल कहाते लिखित आणि मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित ‘अंतराळ स्पर्धा’ या पुस्तकास प्रथम, तर डाॅ. पद्ममिनी पाठक लिखीत आणि काॅन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘टेस्टट्युब जन्मा तुझी कहाणी’ या पुस्तकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिशूसाहित्य विभागात माया दिलीप धुप्पड लिखीत प्रशांत पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘नाच रे बाळा’ या पुस्तकास प्रथम, तर उत्तम कोळगांवकर लिखित आणि प्राईम मिडीयातर्फे प्रकाशित ‘मन माझं नाचतंय थुई थुई’ या पुस्तकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. बाल साहित्य विभागात शिवाजी चाळक लिखीत यशोदिप पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘पाखरमाया’ या पुस्तकास प्रथम, तर मााया दिलीप धुप्पड लिखीत आणि प्रशांत पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘चिमणी उडाली भुर्र’ या पुस्तकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. कुमार साहित्य विभागात विजय तांबे लिखीत आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘बबडू बँकेत’ या पुस्तकास प्रथम, तर डाॅ. सुरेश सावंत लिखीत आणि इसाप प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘युद्ध नको! बुद्ध हवा!’ या पुस्तकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुखपृष्ठ विभागातील प्राैढ विभागात डाॅ. अमित करकरे लिखीत आणि मधुश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘अक्कलखाते’ या पुस्तकाच्या चित्रकार सायली भगली-दामले यांच्या मुखपृष्ठास प्रथम, डाॅ.आशुतोष जावडेकर लिखीत आणि रोहन प्रकाशनार्फे प्रकाशीत ‘वा! म्हणताना…’ या पुस्तकाचे चित्रकार अन्वर हुसेन यांच्या मुखपृष्ठास द्वितीय पुरस्कार, तर अनघा तांबोळी लिखीत आणि डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘धुकं’ या पुस्तकाचे चित्रकार सरदार जाधव यांच्या मुखपृष्ठास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. मुखपृष्ठ विभागातील बाल विभागात स्वाती राजे लिखीत आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘अंधाराचं गाव’ या पुस्तकाचे चित्रकार राजेश भावसार यांना प्रथम, ज्योती कपिले लिखीत आणि जे.के. मिडिया प्रकाशित ‘ते आंब्याचे दिवस’ या पुस्तकाचे चित्रकार सतीश भावसार यांच्या मुखपृष्ठास द्वितीय, तर ज्ञानादा नाईक लिखीत आणि मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित ‘चेटकिणीशी गट्टी जमली’ या पुस्तकाचे चित्रकार घन:श्याम देशमुख यांच्या मुखपृष्ठास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे.
