fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENT

पाटणकरांचा नवा अंदाज; नेलपॉलिश या हिंदी चित्रपटात वर्णी

‘रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षक पसंतीस उतरल्या होत्या. अण्णा नाईक, शेवंता, पांडू या सर्व व्यक्तिरेखांसोबत पाटणकर ही व्यक्तिरेखासुद्धा चांगलीच लक्षवेधी ठरली. पाटणकरांची ही भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे आता ‘नेलपॉलिश’ या हिंदी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये दमदार पदार्पण करणार आहे. अभिनेता अर्जुन रामपाल यांच्यासोबत तो या चित्रपटात झळकणार आहे. नवीन वर्षात शुक्रवार १ जानेवारीला झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट झळकणार आहे.

‘नेलपॉलिश’ या चित्रपटाबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अधिश सांगतात की, ‘कायद्यावर भाष्य करणाऱ्या या   चित्रपटातून ‘शेड्स ऑफ लॉ’ म्हणजेच कायद्याचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांना पहायला मिळतील. या चित्रपटात काम  करणं हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता’. अर्जुन रामपाल, मानव कौल, आनंद तिवारी, रजित कपूर यासारख्या कलाकारांबरोबर काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.

कॉलेजमध्ये असल्यापासून ‘पुरुषोत्तम’, ‘फिरोदिया’ करंडक’ सारखे अनेक व्यासपीठ गाजवणारे अधिश यांनी आपली कलेची आवड जोपासण्यासाठी इंजिनियरची नोकरी सोडून कलेसाठी पूर्णवेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘राज्य नाटय’ स्पर्धेत प्रथम आलेलं व अभिनयाचं विशेष पारितोषिक मिळालेलं ‘एक रिकामी बाजू’, ‘बेईमान’, ‘मी रेवती देशपांडे, ‘आषाढातील एक दिवस’, ‘हॅम्लेट’ तसेच स्वत: लेखन आणि अभिनय केलेलं ‘कसाब आणि मी,’ ‘संगीत हमीदाबाईची कोठी’, ’धुवान’, ‘अपराधी सुगंध’, ‘प्राईस टॅग’ यांसारख्या नाटकांसोबत ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘एक हजाराची नोट’, ‘तुंबाड’, ‘मेकअप’ चित्रपटांमध्ये सुद्धा अधिश यांनी अभिनय केला आहे. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकांमध्ये झळकलेल्या अधिश यांनी ‘स्त्रीलिंगी –पुल्लिंगी’ या वेबसीरीज मध्येही आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत.

लेखन, अभिनय, दिग्दर्शन अशा क्षेत्रांत मुशाफिरी करत कलेचा दमदार ठसा उमटविणारे अधिश आता हिंदीत आपली वेगळी छाप पाडतील हे नक्की !

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading