Saturday, June 20, 2026
PUNE

ऐका हो ऐका हॉर्न वाजवूू नका…

लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस यांच्यावतीने नो हाँकींग डे उपक्रमाचे आयोजन
पुणे :  एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार…ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका…एकत्र येवूया ध्वनी प्रदूषण कमी करुया…स्वच्छ पुणे शांत पुणे पण कधी, आपण सर्वजण नो हाँकींग ची शिस्त लावू आधी…नका वाजवू हॉर्न तब्येत राहील छान… अशा घोषणा देत पुणेकरांनी नो हाँकीग डे अर्थात नो हॉर्न डे राबविला. प्रातिनिधीक स्वरुपात टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे नो हॉर्न डे हा जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला. 
लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस (वाहतूक विभाग) यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना राबविण्यात आली. यावेळी पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्रा.पद्माकर पुंडे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, दिलीप हल्याळ, पोपटलाल शिंगवी, प्रमोद ढेपे उपस्थित होते. साई पॅकेजिंगचे शंतनु प्रभुणे यांनी उपक्रमाला सहकार्य केले आहे. 
राहुल श्रीरामे म्हणाले, पुण्यात लोकसंख्येपेक्षा जास्त वाहनांची संख्या आहे.  साधारणत: दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकरांना या अनावश्यक हॉर्नमुळे  ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते. त्यामुळे अनावश्यक हॉर्न वाजवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
देवेंद्र पाठक म्हणाले, वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्न चा आवाज प्रमुख कारण आहे. त्याच प्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.     मकरंद टिल्लू म्हणाले, शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी नो हाँकींग डे पाळण्याचे आवाहन संस्था करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading