नितेश भारद्वाज, आयुष निगम आणि शशांक निमकर यांचा ८ व्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन मध्ये गौरव
पुणे, दि. ५ – ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी)च्या वतीने आयोजित आठव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय) मध्ये नितेश भारद्वाज, आयुष निगम आणि शशांक निमकर यांचा गौरव करण्यात आला. सदर परिषदेत सहभागी झालेल्या ३ विभागातील १८ संशोधकांमधून प्रत्येक विभागातील एक अशा पद्धतीने या संशोधकांची निवड आली. यामध्ये आदिवासी विभागात नितेश भारद्वाज (उलगुलन फाउंडेशन- आदिवासी जनजागृती), ग्रामीण विभागात आयुष निगम (डिस्टिंग्ट हॉरिझॉन) तर शहरी विभागात शशांक निमकर (अर्थ तत्व) यांची निवड करीत त्यांना रोख रु. ५० हजार देत गौरविण्यात आले.
नितेश भारद्वाज उलगुलन फाउंडेशन- आदिवासी जनजागृती संस्थेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत आहेत. सध्याच्या काळात डिजिटल माध्यमे व मोबाईलचे महत्त्व लक्षात घेत स्थानिकांमध्ये जागृती निर्माण करीत स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ते काम करीत आहेत. आयुष निगम यांनी आपल्या डिस्टिंग्ट हॉरिझॉन या स्टार्ट अप मार्फत शेतीसाठी लागणारी मशिनरी बनविली असून सदर मशिनरी ही सोलर पेक्षा पाच पट कमी खर्च आणि अर्ध्या वेळेत जीएचजी इमिशन (ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन) कमी करण्यास सक्षम असेल.याद्वारे शेतक-यांचा खर्च वाचून त्यांना फायदा होऊ शकणार आहे.
तर शशांक निमकर हे आपल्या ‘अर्थ तत्त्व’ या संस्थेच्या माध्यमातून सिरॅमिकचा पुनर्वापर करीत गृहपयोगी भांडी बनविण्याचा उपक्रम राबवीत आहेत. याद्वारे खाणकामावर मर्यादा येऊन नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होऊन निसर्गाचे संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते बनवीत असलेली भांडी ही देखील झिरो वेस्ट करण्यावर त्यांनी भर दिला आहे हे विशेष.
आज परिषदेच्या समारोप प्रसंगी सदर विजेत्यांच्या घोषणा करण्यात आली. प्रत्येक सामाजिक संशोधकाला त्याच्या उपक्रमासाठी रोख रु. ५० हजार देत गौरविण्यात आले. याशिवाय पुढील काळात त्यांना पीआयसीच्या वतीने मेंटरिंग (मार्गदर्शन) देखील करण्यात येणार आहे.
राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी इंस्टीट्यूट फॉर कन्टेम्पररी स्टडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक विजय महाजन, पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचे डॉ. विपिन कुमार, पीआयसीचे सहयोगी संचालक अभय वैद्य या वेळी उपस्थित होते. दि. ४, ५ डिसेंबर च्या या दोन दिवसीय ऑनलाईन परिषदेचे आयोजन पीआयसीच्या वतीने करण्यात आले होते. नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन (एनआयएफ) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यांचे सहकार्य परिषदेला लाभले आहे.
देशभरातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी विभागातील नावीन्यपूर्ण संशोधनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश असून दरवर्षी यासाठी देशभरातून संशोधक सहभागी होत असतात. शिक्षण, आरोग्य व पर्यावरण यांसारख्या विषयातील देशभरातील १०० हून अधिक संशोधकांनी आपल्या संशोधनासह यावर्षी परिषदेसाठी नोंदणी केली होती. ज्यामधून तज्ज्ञ समितीकडून ८ राज्यातील १८ सामाजिक संशोधकांची (सोशल इनोव्हेटर्सची) निवड करण्यात आली आहे. यामध्ये ११ संशोधक हे महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. आदिवासी, ग्रामीण व शहरी अशा तीन प्रकारात हे १८ संशोधक आपल्या नवसंकल्पांचे सादरीकरण परिषदे दरम्यान ऑनलाईन पद्धतीने झाले.
