Friday, October 23, 2026
PUNE

समाजात चांगुलपणा पेरण्यासाठी प्रत्येकाचे योगदान मोलाचे – शेखर गायकवाड

‘सूर्यदत्ता’चे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना तिसरा लायन्स समाजरत्न पुरस्कार प्रदान

पुणे : “मानवता हेच सर्वात प्रधान्याचे मूल्य आहे, हे कोरोनाने दाखवले आहे. समाजातील अनेकांच्या चांगुलपणामुळे या कठीण परिस्थितीत गरजूंना आधार मिळाला. समाजातील लबाडी संपवून चांगुलपणा पेरण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने संवेदनशीलता जपत चांगले काम करत राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.


लायन्स क्लब ऑफ पुणे ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी प्रतिष्ठान व लायन्स फ्रेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना ‘लायन्स समाजरत्न पुरस्कार’ गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित मोफत मधुमेह तपासणी व मधुमेहतज्ज्ञ डॉ. अश्विनी जोशी यांचे व्याख्यान झाले.

शनिवारी बावधन येथील ‘सूर्यदत्ता’च्या बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या सोहळ्याला माजी पोलीस अधिकारी विठ्ठल जाधव, वरिष्ठ पत्रकार सम्राट फडणीस, डॉ. सतीश देसाई, डॉ. संदीप बुटाला, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल व मधुमेह जनजागृती कार्यक्रमाचे संयोजक लायन चंद्रहास शेट्टी, लायन श्याम खंडेलवाल, लायन सतीश राजहंस, आर के शहा, दीपक लोया, ज्योतीकुमार अगरवाल, जितेंद्र मैड, प्रकाश नारके, विजय रोडे आदि उपस्थित होते.
शेखर गायकवाड म्हणाले, “कोरोनाने सगळ्याच क्षेत्रात बदलाचे वारे आले आहेत. अशावेळी शिक्षण, सामाजिक क्षेत्रात सातत्याने नवनवे प्रयोग व्हायला हवेत. कलबाह्य शिक्षण सोडून आपण अद्ययावत ज्ञान देण्यावर भर द्यायला हवा. व्यापारी दृष्टीने शिक्षणाकडे न बघता सामाजिक जाणिवेतून शिक्षण दिले पाहिजे. डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, अशा स्वरूपाचे शिक्षण प्राध्यापकांचे ध्येय असावे. आम्ही साखर क्षेत्रातही अनेक बदल करत आहोत. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत.”


हा पुरस्कार पुरस्कार स्वीकारताना आनंद झाल्याचे सांगून प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “गरजूंना मदतीचा हात देणे हे आपले सामाजिक दायित्व आहे. त्याच भावनेतून गेली दोन दशके सुर्यदत्ता संस्था काम करत आहे. नाविन्यपूर्ण आणि शाश्वत शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘शेअरिंग इज गेनिंग’ या तत्वानुसार अपल्यालाकडे असलेल्या ज्ञान, अर्थ, वेळ इतरांना देत जावे. निस्वार्थ सेवा हे आपले उद्दिष्ट असावे. गेल्या आठ-नऊ महिन्यात कोरोनाने माणुसकीचा बंध आणखी दृढ झाला आहे.”
विठ्ठल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात चंद्रहास शेट्टी म्हणाले, “मधुमेहाबाबत जनजागृतीसाठी गेली १७ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाव्रतीला सन्मानित करण्यात येते.” सूत्रसंचालन प्रकाश नारके यांनी केले. आर. के. शहा यांनी आभार मानले.

स्टार्टअप, कौशल्य शिक्षण गरजेचे : सम्राट फडणीस

लोकशाहीच्या चारही स्तंभांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी केली. या नकारात्मक स्थितीत झोकून देऊन काम करणाऱ्या डॉ. संजय चोरडिया यांच्यासारख्या सेवाव्रतींचा सन्मान सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. वैश्विक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होणारे बदल, तंत्रज्ञान, नवकौशल्ये आपल्याकडील शिक्षकांना देण्यासाठीची त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे. आजच्या काळात शिक्षणात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज आहे. शंभर वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीने जशी चाळ संस्कृती वसवली, तशी येत्या काळात कोरोनामुळे नवी संस्कृती उदयास येईल. आपली परंपरागत चांगली मूल्ये जोपासत नव्या गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading