बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन – भारती सिंह आणि हर्ष यांना जामीन मंजूर
मुंबई, दि. 23 – कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना थोडा दिलासा मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने दोघांचा जामीन मंजूर केला आहे, सोमवारी त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. भारती आणि हर्ष यांच्या जामीन अर्जावर एनसीबी आपले उत्तर आज दाखल करुन सुनावणीसाठी पुढील तारीख मागणार होते.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने भारती सिंहच्या घरावर शनिवारी छापा टाकला होता. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनसीबीने एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या दोघांनाही मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती. भारती आणि हर्षने जामीनासाठी अर्ज केला होता, त्यावर आज सुनावणी झाली.
