चपराक दिवाळी अंकाचे शंभर ठिकाणी प्रकाशन
पुणे – करोनासारख्या जागतिक समस्येमुळे यंदा दिवाळी अंकांचे दिवाळे निघणार अशी शक्यता वर्तविली जात असतानाच घनश्याम पाटील यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्या ‘चपराक’ मासिकाने दसर्याच्या आदल्या दिवशी निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे लोकार्पण केले. त्यानंतर हा अंक 25 देशातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचला असून सोमवार दि. 9 नोव्हेंबर रोजी जगभरात शंभर ठिकाणी प्रकाशनाचे कार्यक्रम करून एक वेगळा विक्रम निर्माण केला आहे.
याबाबत ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांनी सांगितले की, मराठी साहित्याला आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि नैराश्य झटकून नवे चैतन्य निर्माण करण्यासाठी हा प्रयोग केला. शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. प्रतापराव भोसले आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक दत्तात्रय नाईकवाडे यांच्या पुढाकारातून अमेरिकेतील मिनेसोटा येथे प्रकाशन झाले. महाराष्ट्रात सातार्यात खासदार श्रीनिवास पाटील, कवी सुहास कोेळेकर यांच्या उपस्थितीत, चंद्रपूरात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सुप्रसिद्ध नाट्यलेखक व कवी श्रीपाद जोशी, संशोधक प्रशांत आर्वे, कवयित्री पद्मरेखा धनकर, डॉ. सचिन वझलवार यांच्या उपस्थितीत, लातूरात माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांच्या उपस्थितीत, उस्मानाबादला माजी राज्यमंत्री राणाजगजीतसिंह पाटील, नगरपरिषदेचे गटनेते युवराज नळे, कवी माधव गरड, डॉ. रूपेशकुमार जावळे, भा. न. शेळके, राजेंद्र अत्रे आदींच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

सोलापूर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेच्या वतीने आकाशवाणीचे सहाय्यक संचालक आणि लेखक सुनील शिनखेडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, आय. एम. एस.चे संचालक अमोल जोशी, मसाप कार्याध्यक्ष सायली जोशी, पत्रकार सागर सुरवसे उपस्थित होते. सांगोला येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने विभागीय अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, मानदेश, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व प्रांतात चपराक दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळे संपन्न झाले.
नाशिकमध्ये सुप्रसिद्ध लेखक आणि समीक्षक डॉ. राहुल पाटील, डॉ. यशवंतराव पाटील, विश्वास देवकर, सुरेखा बोर्हाडे, किरण सोनार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. नगरला सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे, गायिका डॉ. धनश्री खरवंडीकर, संपादक महेंद्र कुलकर्णी, अनिरूद्ध देवचक्के, किशोर मरकड, जयंत येल्लूरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
अंबेजोगाईत नगराध्यक्षा रचना मोदी, नगरसेविका संगीता व्यवहारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता दमकोंडवार, सुप्रसिद्ध कवी दिनकर जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. नांदेड येथे श्रीकृष्ण प्रभात शाखेत डॉ. गोपाल राठी, दिलीप कस्तुरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तर उदगीर येथे ग्रंथप्रेमी उद्योजक सूर्यकांत मुक्कावार, रामचंद्र तिरूके, रामदास केदार, लक्ष्मण उगले, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार स्वामी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
औरंगाबाद येथे ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सीमा भागात ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य लखनसिंह कटरे यांनी गोंदियात चपराकच्या अंकाचे प्रकाशन केले.
एकंदरीत काल महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यात आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांतही चपराक दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळे झाल्याने साहित्यक्षेत्र ढवळून निघाले आहे. 111 वर्षाहून अधिक काळाची परंपरा असलेल्या दिवाळी अंकाला मिळणारा हा प्रतिसाद प्रत्येक मराठी भाषकांसाठी अभिमानास्पद आहे.
