मराठी रंगभूमीदिनी रंगला ‘नांदी आणि नाट्यपदे’ कार्यक्रम
पुणे : ‘शाकुंतल’, ‘सौभद्र’, ‘विद्याहरण, ‘मत्स्यगंधा’ आणि ‘अमृतसिद्धी’या संगीत नाटकांतील लोकप्रिय रचनांनी नाट्य रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली.
निमित्त होते ते मराठी रंगभूमीदिनाचे. स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान आणि यशवंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नांदी आणि नाट्यपदे’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत शाकुंतल या नाटकाला 140 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या नाटकातील ‘पंचतुंड नररूंडमालधर’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या नांदीला जोडूनच क्वचितच ऐकायला मिळणारे ‘अष्टमूर्ती परमेश’ हे सूचकपद सादर करण्यात आले.
या नंतर संगीत शाकुंतल नाटकातील ‘वेड्या मना तळमळसी’ आणि संगीत मत्स्यगंधा नाटकातील ‘गर्द सभोती’ ही दोन पदे सुचेता अवचट यांच्या शिष्या वेदवती परांजपे यांनी सादर केली. चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे यांच्या शिष्या सुनीता गोकर्ण यांनी संगीत विद्याहरण नाटकातील ‘आता राग देई’ हे पद सादर केले.
संगीत सौभद्रमधील अभावानेच ऐकायला मिळणारे पण अविट गोडीचे ‘पुष्प पराग सुगंधित’ हे पद चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे यांचे शिष्य प्रज्ञेश नेर्लेकर यांनी तर संगीत अमृतसिद्धी या नाटकातील ‘धावत येई सखया’ हे पद सुचेता अवचट यांच्या शिष्या अभिनेत्री गात यांनी सादर केले. कार्यक्रमाची सांगता संगीत सौभद्र नाटकातील ‘रणधीरा श्रीवर वरद’ या भरतवाक्याने झाली. नांदी आणि भरतवाक्य डॉ. प्रीती गोखले, मेघना नातू आणि ज्योती फाटक यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे निवेदन माधुरी व अभिषेक अवचट यांनी केले. संजय गोगटे, चारुशीला केळकर, प्रांजली पाध्ये (हार्मोनिमय), केदार तळणीकर (तबला) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाची संकल्पना चारुशीला केळकर, सुचेता अवचट आणि मुक्ता पाध्ये यांची होती. हा संपूर्ण कार्यक्रम स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर आणि पाध्ये मीडिया सर्व्हिसेसच्या यू ट्यूब चॅनलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
