Monday, June 15, 2026
PUNE

महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड; पर्वती, पद्मावती विभागात चक्राकार भारनियमन

पुणे, दि. 10 : महापारेषणच्या नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागातील 82 वीजवाहिन्यांवर शनिवारी (दि. 10) सकाळी 8.35 वाजेपासून चक्राकार पद्धतीने दोन ते अडीच तासांचे विजेचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे 2 लाख 60 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ते जेजुरी या 400 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाला व वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे जेजुरी ते कोयना टप्पा क्र. 4 या 220 केव्ही अतिउच्चदाब वाहिनीचा व त्यावरील नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा देखील वीजदाब कमी झाला. या उपकेंद्रातील कमी वीजदाबामुळे महावितरणचे पर्वती व पद्मावती विभागातील सुमारे 15 उपकेंद्र आणि 82 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, सर्वच ठिकाणी भारव्यवस्थापन शक्य नसल्याने नाईलाजास्तव सिंहगड रोड, धायरी, वडगाव, हिंगणे, किरकिटवाडी, आंबेगाव, बिबवेवाडी, धनकवडी, शांतीनगर, कात्रज, आंबेगाव, बालाजीनगर आदी परिसरात सध्या दोन ते अडीच तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading