Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

Movie Review – दिल बेचारा…

‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या जगभर गाजलेल्या प्रख्यात कादंबरीवर आधारित ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ हा त्याच नावाचा चित्रपट सर्वदूर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाचा आणि कादंबरीचा काहीसा आधार घेत भारतीय नजरेतून टिपलेला ‘दिल बेचारा’ हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ठरला आहे, तर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून मोठे नाव असलेले मुकेश छाब्रा यांनी या चित्रपाटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे.

कथेचा नायक इम्यानुअल राजकुमार ज्युनिअर (सुशांत सिंग राजपूत) व नायिका किझी बसू (संजना संघी) दोघेही स्वभावाने एकमेकांपसून निराळे, मात्र शरीराला जडलेल्या दुर्धर आजाराने दोघेही ग्रस्त आहेत. अबोल्यातून मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि आकंठ प्रेमात बुडल्यानंतर काळाने आयुष्यावर घातलेला दुर्दैवी घाला अशा विविध होणारा घटनांचा साक्षीदार म्हणजे ‘दिल बेचारा’ हा चित्रपट.आयुष्यात येणार्‍या प्रेम, मैत्री, नाते आणि दुरावा या कधी सुखवणाऱ्या तर कधी दुखावणाऱ्या भावनांची ओळख करून देतो.

चित्रपटाच्या कथा आणि पटकथेचे लेखन शशांक खेतान आणि सुप्रोतिम सेनगुप्ता यांनी केले असून कथेला भारतीय स्पर्श देताना त्याला वास्तवाचे व ओघवत्या पटकथेचे मात्र बळ दिलेले नाही, असे जाणवते. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी एक था राजा, एक थी राणी…. हा मोनोलॉग सोडता कुठलाच संवाद प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाही. शिवाय ए. आर. रेहमान यांचे संगीत पटकथेला पुढे ढकलणारे असले तरी, कथेच्या हातात हात घालून पुढे जाणारे किंवा गुणगुणत राहवेसे वाटणारे एकही गाणे या अल्बम मध्ये नाही. त्यामुळे प्रेमाची गोष्ट सांगताना संगीताची साथ नसणे, हे किती निरस आहे, याचा अंदाज आपणच बांधधलेला बरा.

चित्रपटाची एक सावरती बाजू म्हणजे चित्रपटातील एकंदर सर्वच कलाकारांचे काळजाला भिडणारा अभिनय. कास्टिंगचा मोठा अनुभव पाठीशी असल्याने मुकेश छाब्रा यांनी भूमिकेत चपखल बसतील असे कलाकार निवडले आहेत. आपल्या अखेरच्या चित्रपटात सुशांतने साकारलेले पात्र हे त्याच्या आयुष्यात नुकत्याच घडलेल्या ट्रॅजेडीच्या किती जवळ जाणारे आहे, याचा अंदाज आपल्याला काही सिन्समधून येतो. त्यामुळे चित्रपट बघताना हा दुर्दैवी योगायोग त्याच्या वाट्याला का आला, याबद्दल सतत खंत वाटत राहते.’ऑक्टोबर’ सारख्या परीक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या दर्जेदार चित्रपटानंतर थेट ‘दिल बेचारा’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या संजना संघीचा अभिनय अक्षरशः भारावून टाकणारा आहे. शिवाय स्पेशल अपिअरन्स मध्ये येणारा सैफ अली खान आपल्या सरस अभिनयाने त्याची भूमिका निभावून नेतो तर किझी च्या आई-वडिलांच्या भूमिकेत असणारे स्वस्तिका मुखर्जी आणि सास्वता चॅटर्जी आपले पात्र उत्तम रंगवतात. मॅनी म्हणजेच इम्यानुअलच्या बेस्ट फ्रेंड च्या भूमिकेत दिसणारा साहिल वैद चित्रपटात मैत्रीचे धागे गुंफताना दिसतो.

‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ हा चित्रपट 2 तासांचा असून ‘दिल बेचारा’ केवळ 1 तास 40 मिनिटांमध्ये गुंडाळला आहे. त्यामुळे चित्रपटातील काही सिन्स जे अधिक प्रभावीपणे मांडता आले असते, ते राहून अक्षरशः झटपट उरकल्याचे दिसून येते. त्यामुळे अल्पावधीत खूप काही सांगण्याची क्षमता असणाऱ्या मूळ कथानकाला घाईघाईत कात्री मारण्याची काय गरज होती? अशी भावना शेवटी मनात येत राहते,. थोडक्यात सांगायचे तर, एक उत्तम कलाकृती होण्याची क्षमता असून देखील हाताळणी काहीशी चुकल्याने ‘दिल बेचारा’ त्यातील अपूर्ण प्रेमाच्या कथेप्रमाणेच एक अपूर्ण वाटणारा चित्रपट आहे असं म्हणावं लागेल. मात्र, सुशांतचा अखेरचा चित्रपट आणि अखेरची आठवण म्हणून ‘दिल बेचारा’साठी एक ट्राय तो बनता है.

चित्रपट – दिल बेचारा
कलाकार – सुशांतसिंग राजपूत, संजना संघी, साहिल वैद, स्वस्तिक मुखर्जी, सास्वता चटर्जी, सुब्बलक्ष्मी, सुनील टंडन इ.
दिग्दर्शक – मुकेश छाब्रा.
कथा,पटकथा – शशांक खेतान, सुप्रोतिम सेनगुप्ता.
संगीत – ए. आर. रेहमान.
OTT – Disney+Hotstar

रेटिंग – 3/5

प्रज्ज्वल खेडकर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading