Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

ऑनलाईन सेवेचा कामगारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र हे बाष्पके व इतर संलग्न यंत्रणेच्या निर्मितीत अग्रेसर आहे. बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती/उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करणे गरजेचे असते. देशभरासह राज्यात कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे बाष्पके संचालनालयाला सेवा प्रदान करण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर बाष्पके संचालनालयाद्वारे बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी www.mahaboiler.com या पोर्टलवर ऑनलाईन सुविधा आजपासून सुरू केली. आज या सेवेचा शुभारंभ कामगार तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या मार्गर्शनानुसार बाष्पके संचालक धवल अंतापूरकर यांनी पुढाकार घेऊन बाष्पक संचालनालयाद्वारे बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी “www.mahaboiler.com” या पोर्टलवर ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.

या पोर्टलचा मुख्य उद्देश हा कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये उद्योगस्नेही भूमिका ठेवत राज्याच्या व्यवसाय सुलभता धोरणाच्या अनुषंगाने राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावावा असा आहे. या ऑनलाईन सेवेमुळे उद्योजकांचा वेळ, पैसा, शारीरिक व मानसिक त्रास कमी होणार असल्याने अधिकाधिक उद्योजकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही दिले योगदान

बाष्पके संचालनालयामार्फत नुकताच ‘बॉयलर इंडिया 2020‘ हा चर्चासत्रे व प्रदर्शनी असा कार्यक्रम वाशी येथील सिडको येथे आयोजित करण्यात आला होता. या चर्चासत्रामध्ये बाष्पक क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी बाष्पक संबंधित विविध विषयांवर व्याख्याने दिली होती. महाराष्ट्रात व देशातील कोविड – १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी आपले सुद्धा काही देणे लागते या उदात्त हेतूने देशविदेशातील बाष्पक क्षेत्रातील या तज्ज्ञांनी २ लाख १० हजार असे संपूर्ण मानधन तसेच बाष्पके संचालनालयाच्या २१ अधिकारी यांनी ३ लाख रुपये असे एकूण ५ लाख १० हजार रुपये “मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-१९” ला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

​वांद्रे येथील कामगार भवन येथील आयोजित कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, कामगार आयुक्त  डॉ. महेंद्र कल्याणकर , कामगार विभागाचे सह सचिव शशांक साठे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारीअधिकारी श्री. श्रीरंगम हे सुद्धा उपस्थित होते.

कोविड -19 संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने पुढाकार घेऊन भारतात पहिल्यांदाच सर्व बाष्पकांना १५ जूनपर्यंत अविरतपणे सुरु ठेवण्यासंबंधी निर्णय घेतला होता व प्रमाणिकरणातून सूट देण्यात आली होती. या निर्णयामुळे सदर सर्व उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading