विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची ई-मेल द्वारे धमकी
पोलिसांकडून परिसराची काटेकोरपणे तपासणी
मुंबई प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच आज सकाळी विधान भवन बॉम्बन उडवून देण्याची धमकी अज्ञाताद्वारे ई-मेलवर देण्यात आली. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच ही धमकी प्राप्त झाल्याने पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा करून काटेकोरपणे तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
आजच्या अधिवेशन कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच काही वेळ विधान भवन उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली. अधिवेशन सुरू असल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व सदस्य आणि अधिकारी मोठ्या प्रमाणावर या परिसरात उपस्थित होते.
धमकी मिळताच पोलिसांनी या परिसरातून सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढून बॉम्ब नाशक पथक व श्वान पथकाला पाचारण केले. विधान भवनाचा संपूर्ण परिसर, इमारतीतील प्रत्येक कक्षाची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे. या परिसराचा बंदोबस्त वाढवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. तसेच विधिमंडळात येण्यासाठी अभ्यागतांना दिले जाणारे पास देखील बंद केले जाण्याची शक्यता आहे.
सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी सीपीएच्या मेल वर एक ईमेल आला. विधानभवनासह स्टॉक एक्सेचेंज, मेट्रो, उच्च न्यायालय आणि बॅंक या ठिकाणी बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात आली. यासाठी वेळही ईमेलमध्ये नमूद करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी परवानगी घेऊन विधानभवनात प्रवेश केला असून तपासणी सुरू आहे. चौकशीतील माहिती जाहीर केली जाईल, असे विधान परिषद सभापती राम शिंदे म्हणाले.
