उस्ताद ज़ाकीरभाई हे स्वतःच एक स्वतंत्र घराणे होते; उस्ताद अमजद अली खान यांचे गौरवोद्गार
पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया, पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना अनुक्रमे २०२५ व २०२६ सालचा उस्ताद ज़ाकीर हुसैन एक्सलन्स पुरस्कार प्रदान
पुणे : उस्ताद ज़ाकीरभाई हे लौकिकार्थाने पंजाब घराण्याचे असले, तरी ते स्वतःच एक स्वतंत्र घराणे होते. त्यांनी तबला वादनकलेला वेगळे आयाम प्रदान केले आणि हे वाद्य अधिक अर्थपूर्ण केले, असे गौरवोद्गार ज्येष्य़ सरोदवादक, पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांनी काढले. ज़ाकीर यांचे मोठेपण फक्त कलाकार असण्यापुरते मर्यादित नव्हते, त्यांचे माणूसपणही तितकेच मोठे होते, असेही ते म्हणाले.
कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ख्यातनाम तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या तालचक्र ट्रस्ट या संस्थेच्या वतीने उस्ताद ज़ाकीर हुसैन एक्सलन्स पुरस्कार सूरू करण्यात आले असून पद्मविभूषण उस्ताद ज़ाकीर हुसैन यांच्या ७५ व्या जयंतीचे औचित्य साधत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला होता. एक लाख रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांना २०२५ च्या तर ज्येष्ठ सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना २०२६ च्या उस्ताद ज़ाकीर हुसैन एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हे दोनही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उस्ताद अमजद अली खान पुढे म्हणाले, “संगीतकलेला धर्म, जात, देश, वंश, भाषा यांच्या मर्यादा नसतात. स्वरलयीचे नाते रक्ताच्या नात्याहूनही अधिक गहिरे असते. स्वर हाच कलाकाराचा ईश्वर असतो. त्याच धाग्याने सर्व कलाकार जोडलेले असतात, ज़ाकीरभाई याचे आदर्श उदाहरण ठरावेत. आज प्रत्येक वादकाला ज़ाकीर होण्याची उमेद असते. पण युवा कलाकारांनी हे लक्षात घ्यावे, की ज़ाकीर होणे कर्मकठीण आहे. त्यासाठी फक्त तबलावादक होणे पुरेसे नाही तर आपले माणूसपणही तेवढेच उंचावणे आवश्यक आहे.” अमजद अली यांनी ज़ाकीर यांच्यासोबतच्या काही आठवणींनाही उजाळा दिला.
पं. हरिप्रसाद चौरासिया म्हणाले, ज़ाकीर यांच्यापाशी संगीत आणि गुरू तसेच बुजुर्गांविषयी आत्यंतिक आदर आणि प्रेम भावना होती. माझ्यासोबत त्यांनी अनेकदा साथसंगत केली आणि आम्ही एकत्रितपणे कलानंद मिळवला.
पं. मंगेशकर म्हणाले, गेले ते दिन गेले, या गीताची आठवण व्हावी, असे आजच्या कार्यक्रमाचे वातावरण आहे. ज़ाकीर यांना मी खूप लहानपणापासून पाहिले, ऐकले आहे. त्यांचे वडील जितके उत्कृष्ट तबलावादक होते, तितकेच उत्तम संगीतकार होते. लतादीदींकडे ते नेहमी येत असत आणि छोटे ज़ाकीरही त्यांच्यासोबत असत. त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. हरिप्रसादजी यांना मी प्रथम आकाशवाणीवर ऐकले आणि लगेच माझे पहिले गीत ‘मावळत्या दिनकरा…’ वाजवण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर ‘मोगरा फुलला…’ साठी त्यांनीच वाजवले. उस्ताद अमजद अली यांनाही मी त्यांच्या तरुणपणापासून पाहिले – ऐकले आहे. ते इतके देखणे दिसत, की त्यांनी चित्रपटांत जावे, असे सुचवावेसे वाटे. या दोन्ही कलाकारांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली, हा आनंदाचा भाग आहे.”
ज़ाकीर यांच्या पत्नी ॲटोनिया मिनिकोला यांनी यावेळी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. ज़ाकीर यांच्या स्मृत्यर्थ पुण्यात पद्मश्री पं. विजय घाटे आणि तालचक्र यांनी एक्सलन्स अवार्ड सुरू करणे, अतिशय आनंदाचे आहे. माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. पं. हरीजी आणि उस्ताद अमजद अली, यांच्याशी ज़ाकीर यांचे अतिशय जवळचे नाते होते, असे त्या म्हणाल्या.
सुप्रसिद्ध तबलावादक व तालचक्र ट्रस्टचे विश्वस्त पद्मश्री पं. विजय घाटे म्हणाले, “मी वयाच्या ९ व्या वर्षी ज़ाकीरभाईंना प्रथम ऐकले – पाहिले. त्यांच्या दायां-बायांचा तो नादानुभव आजही कानात आहे. त्यांच्या नावाने कलाक्षेत्रातली बुजुर्गांना गौरवण्याचा हा उपक्रम, कलेप्रती अभिवादन करण्याचा प्रयत्न आहे.” प्रतीक राजकुमार यांनी संपादित केलेल्या ‘जिक्र उस्ताद का’ या त्रैमासिकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पुरस्कार प्रदान समारंभात विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना १९९८ साली आलेल्या सई परांजपे दिग्दर्शित ‘साज’ या चित्रपटातील गोरख कल्याण रागावर आधारित असलेल्या ‘फिर भोर भई जागा मधुबन…’ या गाण्याची होती. हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले असून, उस्ताद ज़ाकीर हुसैन यांनी संगीतबद्ध केले होते व विदुषी देवकी पंडित यांनी ते गायिले होते.
या सांगीतिक कार्यक्रमात अमर ओक (बासरी), ताकाहिरो अराई (संतूर), कृष्णा साळुंखे व ओंकार दळवी (पखवाज), नितीन सातव (जेंबे), सुरंजन खंडाळकर (गायन), यशवंत थिट्टे (संवादिनी), शीतल कोलवालकर (कथक), सागर पटोकर (साईड रिदम), ज्ञानेश्वर अंडील (टाळ) आणि केदार मोरे (ढोलक) आदी कलाकारांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या शेवटी स्वतः विदुषी देवकी पंडित यांनीच हे गाणे सादर केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात तबल्याचा अंतर्भाव नव्हता. उस्ताद ज़ाकीर हुसैन यांच्या सारखे तबलावादन कोणीच करू शकत नाही ही भावना अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्या जयंतीला सादर होणाऱ्या या कार्यक्रमात तबला नव्हता.
