Site icon Maharashtra Lokmanch

ग्योथ इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवनद्वारे आयोजित क्रिटिकल झोन्स प्रदर्शनात विविध कार्यशाळांचे आयोजन

पुणे  : ग्योथ इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन, पुणे आणि झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिटिकल झोन्स प्रदर्शनात येत्या शनिवार दि १० डिसेंबर व रविवार दि. ११ डिसेंबर दरम्यान बॉडी मूव्हमेंट कार्यशाळा, पारंपारिक जात्यांवरील ओव्या यांवरील कार्यशाळा आणि फिल्म स्क्रिनिंग यांसारख्या विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम गाव येथील झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय, कुडजे येथे होणार असून ते सर्वांसाठी विनामूल्य आहेत. परंतु संग्रहालयात प्रवेशासाठी असलेले तिकीट काढावे लागणार आहेत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. निसर्गासोबत मानवी सहजीवनाच्या विविध पद्धतींचा दुवा साधण्याचा एक प्रयत्न म्हणून या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे, हे विशेष.
शनिवार दि १० डिसेंबर रोजी सौम्या कौटीया आणि जिया यांची ‘इनर इस्केप’ कार्यशाळा पार पडेल. या कार्यशाळेअंतर्गत संवेदना, स्पर्श, गुरुत्वाकर्षण आणि हालचालींद्वारे जगण्याचे मार्ग शोधण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.  शिवाय मानव – निसर्ग, भाषा-कविता, चळवळी- इतिहास यांचे एकत्रित सहकार्य व संबंधांचा शोध घेण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असून १० डिसेंबर रोजी सायं. ४.३० आणि ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कार्यशाळा होणार आहे.

यानंतर १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पर्यावरण आणि हवामान बदलाशी संबंधित चित्रपट दाखविण्यात येतील. यामध्ये ‘कोरल विमेन’, इन बिटविन आणि ट्रेझर्स ऑफ ग्रासलँड्स’ या लघुपटांचा समावेश आहे.

‘पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’ या अंतर्गत नमिता वायकर यांची कार्यशाळा प्रदर्शनाचा एक महत्त्वाचा असेल. ‘पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’ या कार्यशाळेत ग्रामीण भागातील महिला दगडी जात्यावर जी पारंपरिक गाणी गातात त्यावर नमिता बोलणार आहेत. या सत्रात फोटो, व्हिडिओ आणि गाण्यांसह मल्टिमीडिया स्टोरीज यांचा समावेश असेल. १९८७ पासून तब्बल २५ वर्षे पुण्यातील दोन समाजशास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या गटाने ग्रामीण भागातील महिला रोज गात असलेली तब्बल १ लाख दहा हजारहून अधिक जात्यावरची गाणी या उपक्रमात संकलित केली असून यांमध्ये स्त्रिया व समाजाचे दैनंदिन जीवन, पितृसत्ताक पद्धती, जात, कवी-संत, ऐतिहासिक घटना, बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा रविवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पार पडेल.

Exit mobile version