Site icon Maharashtra Lokmanch

तुकाराम बीजनिमित्त ‘तुका आकाशाएव्हढा’ या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन

????????????????????????????????????

पुणे : तुकाराम बीजेचे औचित्य साधत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे अभंग व गाथा यावर आधारित ‘तुका आकाशाएव्हढा’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमाचे येत्या १९ व २० मार्च रोजी आयोजन करण्यात येणार आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेचे अजित व समीर बेलवलकर यांच्या पुढाकाराने आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून सादर होत असलेल्या या विशेष उपक्रमात नृत्यनाटिका, चित्रपट, प्रकाशन समारंभ आणि सांगीतिक कार्यक्रमाची अनुभूती रसिकांना घेता येईल.

सदर उपक्रमास प्रवेश विनामूल्य असून मोफत प्रवेशिका प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर एरंडवणे येथील निर्मिती ऐमिनंस (मेहेंदळे गॅरेज जवळील अभिषेक व्हेज रेस्टॉरंट असलेली इमारत) या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेच्या कार्यालयात दिनांक १६ मार्च पासून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत उपलब्ध असतील.

उपक्रमाचे उदघाटन पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते १९ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण शाळेच्या एमईएस सभागृहात होणार आहे. उदघाटन समारंभाला प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी जगविख्यात भरत नाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्या शिष्या व कन्या अरुंधती पटवर्धन व त्यांचा सहकारी कल्याणी काणे यांचा सहभाग असलेली ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराज यांच्या रचनांवर आधारित विशेष नृत्यनाटिका सादर करण्यात येईल. 

तर दुसऱ्या दिवशी २० मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संत तुकाराम’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यानंतर मुलाखतकार राजेश दामले हे चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी संबंधित विषयावर संवाद साधतील. याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व चित्रपट अभ्यासक सतीश जकातदार यांची उपस्थिती असेल.

उपक्रमाची सांगता दिनांक २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमाद्वारे होईल.

Exit mobile version