Site icon Maharashtra Lokmanch

विद्यापीठात आपातकालीन वैद्यकीय स्थितीसंबंधी व्याख्यान संपन्न

 

पुणे  – हृदयरोगासारख्या आजारात तातडीची वैद्यकीय मदत, आपातकालीन स्थिती, अपघात तसेच नैसर्गिक आपत्ती अशा घटना आपल्या आजूबाजूस केव्हाही घडू शकतात. अशा प्रसंगी काय करावे याची जाणीव असणे अत्यंत आवश्यवक असते. यामुळे अनेकांचा जीव वाचू शकतो व खूप मोठी हानी टळू शकते. म्हणून आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांना हवे, असे वक्तव्य 108 रुग्णवाहिका सेवेचे प्रमुख संचालन डॉ. गजानन पुराणिक यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभाद्वारे ‘महाराष्ट्रातील आपातकालीन वैद्यकीय सेवा – १०८ रुग्णवाहिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र सरकारच्यावतीने सुरु असलेल्या ‘महाराष्ट्रातील आपातकालीन वैद्यकीय सेवा – १०८ रुग्णवाहिका’ या प्रकल्पाची माहिती देण्याकरीता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना, तातडीची वैद्यकीय मदत हवी असताना १०८ या क्रमांकावर दूरध्वनी केला असता, महाराष्ट्रातील आपातकालीन वैद्यकीय सेवेच्या नियंत्रण कक्षाशी काही क्षणात संपर्क साधून महाराष्ट्रात कुठेही या सेवेचा लाभ घेता येतो. गेल्या १० वर्षात ९५ लाखांपेक्षा अधिक रुग्णांना तातडीच्या परिस्थितीत या सेवेचा लाभ मिळाला आहे. लाखो अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण या सेवेमुळे वाचले असून ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे असे डॉ. पुराणिक म्हणाले. तसेच घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी, कुठेही तातडीच्या मदतीची आवश्यकता असताना १०८ नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले. याप्रसंगी बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा उपक्रम अन्य विभागांमध्येही राबवण्यात येणार असून आपातकालीन स्थितीसंबंधी व्यापक जनजागृतीकरीता सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी दिली.

Exit mobile version