Site icon Maharashtra Lokmanch

महामाता रमामाईंवरील साहित्य इंग्रजी भाषेत आणण्याचा प्रयत्न
– भीमराव आंबेडकर

रमाई महोत्सवाचे उद्घाटन


पुणे, दि. ३ – बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले असता त्या काळात रमामाईंनी अतिशय कष्टाने, धैर्याने घर, कुटुंब सांभाळले. बाबासाहेबांचे शिक्षण अपूर्ण राहू नये, शिक्षणापासून ते विचलीत होऊ नये अशी त्यांची भूमिका होती. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमामाई आंबेडकर या महामातांमध्ये समानतेचा धागा दिसतो तो म्हणजे या महामातांनी महापुरूष घडविले, असे प्रतिपादन रमामाई भीमराव आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केले. महामाता रमामाई यांच्यावरील साहित्य इंग्रजी भाषेमध्ये आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीचे औचित्य साधून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. 3 फेब्रुवारी 2021) बोधीवृक्षाला जल अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते झाले. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात आंबेडकर बोलत होते. सुरुवातीस महामाता रमामाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा महोत्सव दि. 7 फेब्रुवारीपर्यंत महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळात आयोजित करण्यात आला आहे. अ‍ॅड. प्रमोद आडकर महोत्सवाचे अध्यक्ष असून नगरसेविका लता राजगुरू स्वागताध्यक्ष तर विठ्ठल गायकवाड मुख्य समन्वयक आहेत. उद्घाटन सोहळ्यास संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे होते. नगरसेवक अविनाश बागवे, कुणाल राजगुरू यांची उपस्थिती होती.

आंबेडकर म्हणाले, गुजरात दौर्‍यावर गेलो असता तेथील काही लोकांनी रमामाईंचे साहित्य गुजराती भाषेत नसल्याचे आपल्याला आवर्जून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक लोकांनी अभ्यास करून डॉक्टरेट मिळविली. बाबासाहेबांचा अभ्यास करताना रमामाईंविषयी विचार होतो त्यावेळी त्यांच्यावरील साहित्य इतर भाषेत नसल्याने अभ्यासकांसमोर अडचणी येतात. त्यामुळे रमामाईंचे साहित्य विविध भाषांमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे.
महोत्सवाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर म्हणाले, रमाई महोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचा आमचा मानस आहे.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, पूर्व आणि पश्चिम पुण्याचा अनुबंध साधणारा हा महोत्सव आहे. बाबासाहेब आणि रमामाई हे अद्वैत आहे. बाबासाहेब क्रांतीसूर्य आहेत तर रमामाई या प्रभा आहेत. जागतिक कीर्तीच्या विद्वानांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठेपण मानले पण आपल्याकडे मोठेपण मान्य करायला उशीर झाला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या व्यासपीठावरून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर व्हावा, अशी अपेक्षाही देखणे यांनी व्यक्त केली.

रमेश बागवे म्हणाले, बाबासाहेबांच्या अडचणीच्या काळात रमामाईंनी केलेल्या साथीचे वर्णन शब्दांत करता येण्यासारखे नाही. रमामाई यांच्यावरील साहित्य विविध भाषांमध्ये येण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले. आभार लता राजगुरू यांनी मानले.

Exit mobile version