Site icon Maharashtra Lokmanch

लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम तातडीने सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन – रमेश बागवे

पुणे : संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे . हा स्मारकाचा विषय महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा आहे .त्यामुळे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारकाची निविदा प्रक्रिया तत्काळ राबवून काम सुरू करावे अशी मागणी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक ,माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी पुणे महापालिका आयुक्त यांना केली आहे .

याबाबत मातंग एकता आंदोलन सह विविध संघटना व समाजाने वेळोवेळी आंदोलने करुन मागणी केली आहे .या विषयास अनुसरून पुणे मनपाने मौजे संगमवाडी, पुणे येथे आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारण्याचे नियोजित केले आहे. सदरील विषय हा महाराष्ट्रातील मातंग समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे.

विविध निवेदने व पत्राद्वारे मातंग समाजातील विविध संघटनांनी अनेक वेळेस शासनाला, मनपा प्रशासनाला पत्रव्यवहार करून स्मारकाचे काम त्वरित सुरू करण्याची विनंती केली होती, व गेल्या काही वर्षात अनेक वेळेस मनपाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन देखील केले आहेत. राज्य सरकारने वरील घटित केलेल्या आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्रित येऊन सर्वानुमते स्मारकाचा आराखडा तयार केला आहे व तो मनपाने मंजूर देखील केला आहे.
तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये निवेदन देताना समाजातील शिष्ठमंडळास मनपा आयुक्त साहेबांनी हे आश्वासन दिले होते की, आम्ही तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करतो. परंतु आज आश्वासन देऊन ६७ दिवस होऊन देखील काहीच प्रशासनाने केले नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
वास्तविक पाहता मनपाचे सन २०२३-२४ चे अंदाजपत्रकात तरतूद उपलब्ध आहे, स्मारकाची जागा मनपाच्या ताब्यात आहे व स्मारकाचा नियोजित आराखडा देखील तयार आहे. MMC Act (७२ ब) नुसार पूर्ण टेंडर लावण्याचे अधिकार देखील मनपा आयुक्तांना आहेत. मग सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली असताना मनपाने या कामासाठी केलेली दिरंगाई ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोष व चिड निर्माण करणारी आहेत. म्हणून आम्ही विविध संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव आपणास नम्र विनंती करतो की, मनपा प्रशासनाने आमच्या समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये व तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभारण्याचे काम सुरू करावे. व येणाऱ्या ७ दिवसात मनपाने निविदा प्रक्रिया किंबहुना निविदेची जाहिरात तरी प्रसिद्ध करावी. अन्यथा मनपासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही मनपा प्रशासनाची राहील याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा रमेश बागवे यांनी दिला आहे .
यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे ,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले ,अनिल हतागळे ,विठ्ठल थोरात ,सुरेखा खंडागळे ,रवी पाटोळे ,राजश्री अडसुळे यासह पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
( गेल्या वर्षभरापासून स्मारकाचे कामकाज अतिशय संथ गतीने चालू आहे .त्याकरिता आता शासन स्मारकाकडे दुर्लक्ष करीत असेल तर राज्यातील समाज रस्त्यावर उतरून जाब विचारेल .असे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे (महाराष्ट्र शासन ) अध्यक्ष विजय डाकले यांनी यावेळी आवाहन केले )

Exit mobile version