Site icon Maharashtra Lokmanch

सामाजिक भान जपत उभारलेली ‘आस्था’ ही संकल्पना इतर बांधकाम व्यवसायिकांसाठी प्रेरणादायी – चंद्रकांत दळवी

पुणे : ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर ‘आस्था’ ही ‘असिस्टेड लिव्हिंग’ या तत्वावर आधारित संकल्पना संवेदनशील आणि नाविन्यपूर्ण आहे. केवळ आजार म्हणून नाही तर, सध्याची आणि नजीकच्या भविष्यातील परिस्थिती लक्षात घेत शास्त्रोक्त पद्धतीने परांजपे स्कीम्सने यशस्वीरित्या विकसित व कार्यान्वित केलेली जेष्ठ नागरिकांसाठीची ही संकल्पना खऱ्या अर्थाने दिलासा देणारी असल्याचे मत पुणे विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. सामाजिक भान जपत उभारलेली ही संकल्पना आज इतर बांधकाम व्यवसायिकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

परांजपे स्कीम्सच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आणि अभिनव गृप व रेनबो डेव्हलपर्स यांनी विकसित केलेल्या बावधन येथील ‘आस्था पेबल्स’ या ठिकाणी ‘आस्था बाय अथश्री’ या ज्येष्ठांसाठीच्या विशेष संकल्पनेचे उद्घाटन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

परांजपे स्कीम्सचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे आणि  बिझिनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख अमित परांजपे, राहुल परांजपे, रेन्बो डेव्हलपर्सचे सुनील नहार, अभिनव गृपचे श्याम शेंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या आधीची पिढी ही वेगळी होती, आपल्या मुलांची पिढी ही त्याहून वेगळी आहे हे मनावर ठसवूनच आपल्या आयुष्याच्या उतारवयात आत्मसन्मानाने, स्वावलंबी, आरामदायी आणि स्वाभिमानी जीवन जगायचे असेल तर अशा प्रकारच्या संवेदनशील संकल्पना नक्कीच हितावह ठरतील, असे देखील दळवी यांनी यावेळी नमूद केले.

उतारवयात देखील एक अॅक्टिव्ह आयुष्य जगण्याच्या दृष्टीने ‘आस्था’ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘असिस्टेड लिव्हिंग’ व संबंधित सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासोबतच, त्यांच्या निवासाची, जेवणाची, मनोरंजनाची व सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. ही काळजी घेत असताना सर्वोत्तम दर्जाच्या सुविधांसोबतच प्रशिक्षित असे डॉक्टर्स, केअरटेकर हे देखील या ठिकाणी २४ तास उपलब्ध असतील. विशेष म्हणजे कुटुंबियांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन याठिकाणी नाही, अशी माहिती या वेळी अमित परांजपे यांनी दिली.

लहान आजारपणांनंतर अथवा शस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठ नागरिकांना देखभालीची आवश्यकता असते अशा वेळी त्यांचे कुटुंबीय दूर असताना त्यांना नर्सिंग, केअरटेकर, केअरगिव्हर यांकडून योग्य काळजी व वेळेवर रुग्णालयाशी संबधित सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘आस्था’ महत्त्वाचा भाग ठरेल. केवळ सेवा नाही तर घरासारखे वातावरण या ठिकाणी रुग्णांना मिळावे यासाठी आस्थाच्या टीमच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येतात.

याआधी पाषाण येथील अथश्रीमध्ये ‘आस्था’ प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित असून आता बावधन येथेही याअंतर्गत सेवा उपलब्ध असतील. बावधन येथील प्रकल्पामध्ये आज ६० बेड उपलब्ध असून याठिकाणी ८४ ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची सोय होऊ शकते, असेही अमित परांजपे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कमी कालावधीपासून ते अगदी वर्षभर इतक्या काळासाठी येथे राहण्याची सेवा व संलग्न सुविधा ‘असिस्टेड लिव्हिंग’ची गरज असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी घेता येवू शकतात. नजीकच्या भविष्यात शहरात अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचा आमचा मानस आहे, असेही परांजपे यांनी यावेळी नमूद केले.

या आधी न्यूरोलॉजिस्ट डॉ पौर्णिमा गौर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आज सर्वसामान्य नागरिकांचे आयुर्मान हे वाढलेले आपण पाहत आहोत. २०२१ ते २०३० दशक डब्लूएचओने ‘डिकेड ऑफ हेल्थी एजिंग’ म्हणून घोषित केले असताना ‘आस्था’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. आज अनेक ज्येष्ठ नागरिक हे स्मृतीभ्रंश सारख्या आजाराचा सामना करीत असताना कम्युनिटी लिव्हिंग, किंवा बाकी आरोग्य व निवासाच्या सोयी उपलब्ध असणे गरजेचे आहे. परांजपे स्कीम्स यांनी नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. नजीकच्या भविष्यात केअरगिव्हर आणि केअरटेकर यांचे तांत्रिक प्रशिक्षण हे महत्त्वापूर्ण असेल, याकडे देखील डॉ. पौर्णिमा यांनी लक्ष वेधले. यावेळी मीनल परांजपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शशांक परांजपे यांनी आभार प्रदर्शन केले.

परांजपे स्कीम्स हे गेली दोन दशकांहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेत त्यांच्यासाठी सुयोग्य घरे व आवश्यक सेवा ‘अथश्री’ या वैशिष्ट्यपूर्ण गृहसंकल्पनेच्या माध्यमातून यशस्वीपणे पुरवत आहेत. आजवर १२ अथश्री प्रकल्प उभारण्यात आले असून यांमध्ये ४ हजारांहून जास्त ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. पुण्याबाहेर बंगळूरू व बडोदा येथे देखील सदर प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित आहे अशी माहितीही अमित परांजपे यांनी दिली.

Exit mobile version