Site icon Maharashtra Lokmanch

एकही शाळा बंद करणार नसल्याचे महाराष्ट्र समोर कबूल करा छात्र भारतीचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

पुणे : वीस पटाच्या आतील शाळा बंद होण्याच्या संभाव्य निर्णयामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विद्यार्थ्यांसोबत, शिक्षक, पालकांकडूनही या निर्णयाला विरोध होत आहे. छात्र भारती विद्यार्थी संघटनेकडून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना यासंदर्भात खुले पत्र देण्यात आले आहे.
वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा राज्य सरकारकडून बंद करण्यात येणार नाहीत. तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असे विधान शिक्षणमंत्र्यांनी केले होते. शाळा बंद करण्यासंदर्भात अफवा पसरवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे अफवा पसरविणाऱ्याचा शोध घेऊन काठोर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. दरम्यान आपले बोलणे आणि शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे यांचे २१ सप्टेंबर २०१२ रोजीचे पत्र यात प्रचंड विसंगती असल्याचे छात्रभारतीच्या पत्रात म्हटले आहे.
राज्यात ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत. या शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे.’ असे कक्ष अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना दिलेल्या पत्रात मुद्दा क्र. ४ मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अनेक गटशिक्षाधिकारी यांनी ‘२० पेक्षा कमी पटाच्या शाळांचे समायोजन करुन अहवाल सादर करणेबाबत’ विस्तार अधिकारी (शिक्षण) बीट यांना जिल्हा / तालुकास्तरावर दिलेली पत्रंही पुरेसी बोलकी असल्याचा उल्लेख शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून करण्यात आला आहे.
नक्की महाराष्ट्राची दिशाभूल कोण करत आहे? असा प्रश्न छात्रभारतीतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून छात्र भारती आणि अनेक शिक्षण हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्रासमोर चित्र स्पष्ट झाले. खरी परिस्थिती सर्वांसमोर आली. त्याबाबत लक्ष घालून कार्यवाही करण्याऐवजी आपण कारवाईची धमकी देत आहात, ही गंभीर बाब असल्याचेही छात्र भारती विद्यार्थी संघटनचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी म्हटले आहे.
आमच्यावर केसेस जरूर घाला, कारवाई अवश्य करा पण एकही शाळा बंद करणार नाही, विद्यार्थ्यांचे गावाबाहेर, दूरच्या शाळेत समायोजन करणार नाही हे महाराष्ट्रासमोर लेखी कबुल करा असे खुले आवाहानच शिक्षणमंत्र्यांना करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होईल, असं कुठंलंही कृत्य शासन करणार नाही. घरापासून १ किमीच्या आत प्रथमिक शिक्षण आणि ३ किमीच्या आत माध्यमिक शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहात याची हमी द्या असे या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version