Site icon Maharashtra Lokmanch

तीन दिवसात शहरातील तब्बल ९० टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा धक्कादायक दावा


पुणे: शहरातील सर्वच भागातील रस्त्यांना प्रचंड खड्डे पडलेले असताना वाहनचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आलेली आहे.
असे असताना पुणे महापालिकेने तीन दिवसात ९६८ खड्डे बुजवून शहरातील तब्बल ९० टक्के खड्डे बुजविल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
गेले आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. यातील अनेक रस्ते हे पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेल्याने त्यांच्या दर्जावर प्रश्‍न निर्माण झालेला आहे. हे रस्ते कोणत्या ठेकेदाराने केले, कोणत्या अधिकाऱ्यांच्या निगराणाखील केले याची माहिती महापालिकेकडून अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.या रस्त्यावरील खड्डे बुजविले जात आहेत.
महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याच्या कामासंदर्भात आज निवेदन जाहीर केले. त्यामध्ये महापालिकेच्या जुन्या व नवीन समाविष्ट गावांमध्ये पावसाळ्यामध्ये पथ विभागामार्फत रस्ते दुरुस्तीचे कामकाज युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात सुमारे ९० टक्के खड्डे दुरुस्ती, चेंबर दुरुस्ती व पावसाचे पाणी साठल्याच्या ठिकाणाचे निचऱ्याची व्यवस्था केल्याचा दावा केला आहे. मात्र, मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये खड्डे, खचलेले रस्ते अशी स्थिती कायम आहे.
नागरिकांनी खड्ड्यांच्या तक्रार करण्यासाठी (रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत 020-255010832 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रस्ते खोदाई सुरू असल्यास 9049271003 क्रमांकवर भरारी पथकाकडे तक्रार करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पथ विभागातर्फे कोल्ड मिक्स डांबरी माल, कोल्ड इमल्शन, जेट पॅचर मशिन, केमिकल युक्त काँक्रिट वापरून खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच पुनावाला ग्रुपकडूनही मशिन उपलब्ध झाल्या आहेत. तर पथ विभागाकडील ५ रोलर व १५ आरएमव्ही टीम तीन पाळीमध्ये अहोरात्र काम करत आहेत. पथ विभागाकडील सर्व अभियंते आपापल्या कार्यक्षेत्रात काम करीत आहेत. १६ जुलै ते १८ जुलै या तीन दिवसात ९६८ खड्डे बुजविले आहेत. तर ६५३ चेंबर उचलले आहेत.

महापालिकेकडून युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. गेल्या तीन दिवसात ९० टक्के खड्डे बुजविले आहेत. पुढील काही दिवस पाऊस थांबून ऊन पडल्यास खड्डे बुजविण्यास आणखी गती येईल. खड्डे बुजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकल, खडी वापरले जात आहे.’

Exit mobile version