Site icon Maharashtra Lokmanch

कोरोना काळातल्या विनानिविदा एक कोटीच्या कामाची चौकशी होणार अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले मुख्य सभेत आश्वासन

पुणे: कोरोना काळात विनानिविदा एक कोटीचे काम झाल्याचे दाखवून त्याचे बिल मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा घोटाळा समोर आल्याने याचे पडसाद काल च्या महापालिकेच्या मुख्यसभेत उमटले. नगरसेवकांनी प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर टीका करत अशा अधिकाऱ्यांना किती दिवस पाठीशी घालणार असा प्रश्‍न केला. सभागृहात संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर याच्या चौकशीसाठी दक्षता विभागाची समिती स्थापन करण्यात येईल. फौजदारी कारवाई व प्रशासकीय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आज मुख्यसभेत दिले.

कोरोनाकाळात स्मशानभूमीतील कामांच्या निविदा न काढताच सुमारे एक कोटी रुपयांची बोगस बिले सादर केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यावर मनसेतर्फे मुख्यसभेत आंदोलन करण्यात आले. यास महाविकास आघाडीनेही पाठिंबा देत या विषयावरील चर्चेची मागणी केली.
वसंत मोरे म्हणाले, ‘‘संपूर्ण शहर कोरोनात एकजुटीने लढत असताना स्मशानभूमीतील कामाच्या नावाखाली पैसे लुटण्याचा प्रयत्न झाला. यातून महापालिकेची बदनामी झाली आहे. यामागे कोणते अधिकारी आहेत याचा शोध घेऊन कारवाई करा.

पृथ्वीराज सुतार म्हणाले, ‘‘सध्या एकच विषय समोर आला आहे, अशा प्रकारे अनेक बिल काढले गेल्याची शक्यता आहे. महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही.
प्रत्येक अधिकाऱ्याच्या हातातून फाइल गेल्यानंतर अखेरच्या टप्प्यात एका अधिकाऱ्याला हा घोटाळा लक्षात येतो. ही गंभीर बाब आहे. कोरोना काळात झालेल्या विषयांची चर्चा का केली नाही याचा उलगडा या घोटाळ्यामुळे झाला आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केली.

Exit mobile version