Site icon Maharashtra Lokmanch

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील मंजूर 20 वस्तीगृहांसाठी इमारत अधिग्रहण आदी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करा – धनंजय मुंडे यांचे निर्देश

पुणे : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालयास भेट देऊन विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या 20 वस्तीगृहांसाठी इमारती व तत्सम आवश्यक बाबी तातडीने उपलब्ध करण्याबाबत मुंडे यांनी निर्देश दिले.

ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामकाजास गती देण्यासाठी ऊसतोड कामगारांची तात्काळ नोदंणी प्रक्रिया सुरू करण्याचेही त्यानी सुचित करुन यासंबधी सर्व जिल्हाधिकारी यांच्या जिल्हास्तरीय यंत्रणेच्या माध्यमातुन प्रत्येक ऊसतोड कामगाराला ओळखपत्र देण्यासाठी स्थानिक यत्रंणाची मदत घेण्याचेही सांगितले.

याप्रसंगी समाज कल्याण आयुक्तालयाच्या वतीने मंत्री धनंजय मुंडे यांचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागत केले.

विभागाच्या विविध योजनांचा याप्रसंगी थोडक्यात आढावा घेत मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तालय च्या इमारतीची पाहणी केली तसेच समाज कल्याण विभागाच्या जुन्या इमारतीच्या जागी नव्याने उभारण्यात येणा-या प्रस्तावित इमारतीसंदर्भात अधिकाऱ-यांशी याप्रसंगी चर्चा केली.

त्यासंबंधीचे आवश्यकतेनुसार प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी आयुक्त श्री नारनवरे यांना यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या कुठल्याही योजनांना निधी ची कमतरता पडणार नाही यासाठी सातत्याने शासनाकडे आयुक्तालयामार्फत पाठपुरावा करण्याची सूचना व निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपायुक्त  प्रशांत चव्हाण, उपायुक्त रविंद्र कदम पाटील, संगीता डावकर सहाय्यक आयुक्त, पुणे यांच्यासह आयुक्तालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version