Site icon Maharashtra Lokmanch

‘चंद्रकांत दादा आपलं जितक वय आहे, तितकी पवार साहेबांची संसदीय कारकीर्द आहे’ – रुपाली चाकणकर 

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांची रखडलेली नियुक्ती हा विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यावर ‘राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे?’, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यश्र चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काल केला होता. यावर आज सडेतोड उत्तर देत राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी ‘चंद्रकांत दादा आपलं जितक वय आहे, तितकी पवार साहेबांची संसदीय कारकीर्द आहे’, असे म्हणत  पलटवार केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी त्यांचं वय झाल आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची रखडलेली नियुक्ती या विषयावर बोलताना प्रसारमाध्यमांना दिली होती. त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले होते की, ‘राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे?’ यावर चाकणकर उत्तर दिले आहे. राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे चंद्रकांत दादांनी राज्यपालांची बाजू घेवू नये.  तसेच ‘चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावे’, असा टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे.

चाकणकर पुढे म्हणाल्या, गेल्या दीड वर्षापासून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची निवड रखडली आहे.  ही नियुक्ती का रखडली आहे हे महाराष्ट्र पाहत आहे. राज्य सरकार आपल्या अधिकारात काही नावं राज्यपालांना देतात. राजकीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ही नावं मान्य करतात. पण राज्यात आपली सत्ता नाही म्हणून राज्यपालांना हाताशी धरून अडवणूक करण्याचा कार्यक्रम केंद्राकडून सुरू आहे.

Exit mobile version