Site icon Maharashtra Lokmanch

दिलासा – यंदा एसटी ची हंगामी तिकीट दरवाढ नाही

मुंबई, दि. 29 – दरवर्षी दिवाळी सणात होणारी एसटी बसची हंगामी तिकीट दरवाढ यंदा ‘कोरोना’मुळे रद्द करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीत अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द केली आहे. या माध्यमातून एसटीने ‘प्रवाशी देवो भव:’ या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून एसटीकडून दरवाढ केली जाते. ही दरवाढ 30 टक्क्यांपर्यंत करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहे. या अधिकारानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात सर्व प्रकारच्या बससेवेसाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करुन अतिरिक्त महसूल मिळवण्याचा एसटीचा प्रयत्न असतो. पण यावर्षी एसटी महामंडळाने ही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version