Site icon Maharashtra Lokmanch

मौखिक परंपरेतल्या हृदयसंवादाचा प्रभाव साक्षात असतो : डॉ. अरुणा ढेरे

प्रा. मिलिंद जोशी यांच्या ‘व्याख्यानाचे आख्यान’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : छापील शब्दांशी जोडलेला, म्हणजे लिखित परंपरेतला लेखक हा एकाकी असतो ; आणि वाचकही एकाकी असतो, पण मौखिक परंपरेतल्या हृदयसंवादाचा प्रभाव साक्षात असतो. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या पूर्वाध्यक्ष डॉ अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले दिलीपराज प्रकाशनाच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या ‘व्याख्यानांचे आख्यान-चिंतनशील वक्त्याचे खेळकर अनुभवकथन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, दिलीपराज प्रकाशनाचे राजेंद्र बर्वे, मधूमिता बर्वे  यावेळी उपस्थित होते.

डॉ. ढेरे म्हणाल्या, उच्चारित शब्दांची परंपरा ही आपली दीर्घजीवी, मुख्य आणि प्रभावी अशी संवाद परंपरा आहे. तिला पुढे नेण्याचे काम एका बाजूने जसं लोककलावंतांनी आणि प्रवचन-कीर्तनकारांनी केले, तसं ते धुरंधर अशा कसदार वक्त्यांनीही केले. भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य प्रकट करणारे आणि समाजजीवनाच्या स्थिती-गतीच्या संदर्भात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे वक्ते हे महाराष्ट्राला अखंड परंपरेने लाभले. आजही वक्तृत्वाचा तसा प्रभाव टिकवून ठेवणाऱ्या वक्त्यांमध्ये प्रा. मिलिंद जोशी यांचा समावेश आहे. त्यांचे हे नवं पुस्तक त्यांच्या पंचवीस वर्षांच्या वाकसंप्रदायी वारीची हकीकत सांगणारे आहेच, पण श्रोता आणि वक्ता यांच्या गुणावगुणांवर मार्मिक भाष्य करणारेही आहे.

डॉ देखणे म्हणाले, लेखक आणि वाचक हा अदृश्य संवाद आहे. तर वक्ता आणि श्रोता हा दृश्य संवाद आहे. व्याख्यान आणि लेखन यात निर्मितीच्या अंगाने भेद असला तरी दोन्हीही सृजनाचेच आविष्कार आहेत, तसेच चिंतनाला, अभ्यासाला आणि प्रतिभेला मूर्त रूप देणारे आहेत. हे पुस्तक एका व्यासंगी वक्त्यांची वक्तृत्व गाथा आहे या पुस्तकात प्रा. जोशींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचे दर्शन घडविले आहे.’

प्रा.  जोशी म्हणाले, ‘मला प्राचार्य शिवाजीराव भोसले भेटले नसते तर  मी वक्ता झालो नसतो. वक्तृत्व ही शब्दांची आतषबाजी नाही, ती जीवनाची उपासना आहे. उत्तम तयारी आणि उस्फूर्तता यातूनच देखणे वक्तृत्वशिल्प आकाराला येते. वक्तृत्व हा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा अनेक प्रक्रियांचा संयुक्त खेळ आहे. गेली पंचवीस वर्षे व्याख्यानाच्या निमित्ताने भ्रमंती करताना जे समाज आणि संस्कृती दर्शन घडले ते या पुस्तकात मांडले आहे.’

Exit mobile version