fbpx
Thursday, April 25, 2024

कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन

Latest NewsPUNE

प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळी, अनाकलनीय : विजय पराडकर

पुणे – प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळी, अनाकलनीय असते. शब्दांसह, शब्दविरहित असे चित्रांचे प्रकार असले तरी त्यात तुलना होऊ शकत नाही. आषय व्यक्त होण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते, चित्राखालील ओळीतून शब्द हवेत असे माझे मत आहे. व्रत म्हणून व्यंगचित्र काढत आलो आहे. व्यंगचित्रकाराकडेे जादूचा चश्मा असतो तो माझ्याकडेही आहे. या जादूच्या चष्म्यामुळे मला व्यक्तीच्या मागील बाजूही दिसते ती विनोदाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार विजय पराडकर यांनी केले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा वाढदिवस आणि त्यांच्या शब्दविरहित हास्यचित्रांच्या कारकिर्दीलाही 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व्यंगचित्रांच्या दुनियेतील त्यांच्या या प्रवासाला सलाम करण्यासाठी ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन‘ या मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आणि गंगोत्री होमस्‌‍ ॲन्ड हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालनात ‘सलाम हसऱ्या रेषांना‘ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनातील अखेरच्या दिवशी पराडकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संवादाचा विषय होता भाषा रेषांची. त्यावेळी त्यांनी नोकरी ते व्यंगचित्रकार असा प्रवास उलगडला. पराडकर यांच्याशी ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन‘चे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत यांनी संवाद साधला. गंगोत्री होमस्‌‍ ॲन्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर यांनी पराडकर यांचा सृतीचिन्ह देऊन सत्कार केला. ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन‘चे माजी अध्यक्ष चारुहास पंडित तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यंगचित्रकाराकडे अपघाताने वळलो असे सांगून पराडकर म्हणाले, लहानपणापासून विनोदी साहित्य वाचनाची तसेच चित्र काढण्याचीही आवड होती. वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढत होतो. स्पर्धेत पाठविलेल्या चित्राला पारितोषिक मिळाल्यानंतर या कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. नोकरी करता करता व्यंगचित्र काढत होतो. निवृत्त झाल्यानंतर 1996 नंतर पूर्णवेळ या कलेला वाहून घेतले. चित्र काढण्याची कल्पना कशी सुचते हे सांगता येत नाही पण हाती कागद घेतला की चित्र कागदावर उतरतात. दीड–दोन तासात 17 चित्र काढली असल्याची आठवण त्यांनी सांगितली. शाळेतील आठवण सांगताता ते म्हणाले, शिक्षकांनी चित्र काढायला सांगितले होते, सगळी मुले चित्र काढत असताना मी वाकड्या–तिकड्या रेषा काढून चित्र काढत होतो. त्यावेळी शिक्षक माझ्या शेजारी कधी येऊन बसले ते मला कळलेच नाही. चित्र पाहून ते चिडतील असे वाटले; पण त्यांनी माझ्या चित्राचे कौतुक केले. पायाचे दुखणे असलेल्या व्यक्तीने माझे व्यंगचित्र पाहिले. चित्र पाहून पायाचे दु:ख विसरलो असे जेव्हा त्या व्यक्तीने सांगितले त्यावेळी ते माझ्या व्यंगचित्रासाठीचे सर्वात मोठे मानधन मिळाल्याची भावना झाली.

Read More