पुण्यातील वास्तुविशारद महेश नामपुरकर यांच्या कार्याचा पंतप्रधानांकडून गौरव
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद महेश नामपुरकर यांच्या वास्तुकला व लँडस्केप डिझाइन क्षेत्रातील कार्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पत्राद्वारे त्यांनी प्रशंसा केली असून यामध्ये नामपुरकर यांच्या राष्ट्रनिर्मितीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली आहे. नुकतेच नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाकडून पाठविलेले हे पत्र महेश नामपूरकर यांना प्राप्त झाले असून या पत्रामध्ये नामपुरकर यांच्या समाजोपयोगी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक वास्तु संकल्पनांचे विशेष उल्लेख करण्यात आले आहेत.
उदयोन्मुख भारताच्या उभारणीत नामपूरकर यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असून सार्वजनिक जागा, संस्थात्मक प्रकल्प आणि लोकाभिमुख वास्तुरचना यामधून त्यांनी समाजाला सकारात्मक दिशा दिली असल्याचे पंतप्रधानांनी या पत्रात नमूद केले आहे.
देशाच्या सर्वोच्च पदावरून मिळालेला हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून महाराष्ट्रातील वास्तुविशारद समुदायासाठीही अभिमानास्पद आहे. वास्तुकलेद्वारे राष्ट्रसेवेला नवे बळ देणारा हा सन्मान असल्याचे मत यावेळी महेश नामपुरकर यांनी व्यक्त केले. या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, “माननीय पंतप्रधानांकडून मिळालेले हे प्रशंसापत्र मला अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि समर्पणभावनेने देशासाठी कार्य करण्याची नवी ऊर्जा देणारे आहे.”
