fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsPUNE

अधात्म आणि वारकरी संप्रदायाशी नाते जोडणारा सहजीवन गणेशोत्सव मंडळाचा देखावा

पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेले सहकारनगरमधील सहजीवन गणेशोत्सव मंडळ धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित आहे. सुवर्ण महोत्सवाची सुरुवात भागवत सप्ताहने झाल्याने अध्यात्म आणि वारकरी संप्रदाय याचे नाते जोडणारा; विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घडविणारा भव्य असा देखावा उभारण्यात आला आहे.
सहकारनगर क्रमांक दोनमधील मंडळाशेजारील भव्य पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आध्यात्किम, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये हिरीरिने सहभागी होत आहेत. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर रचित आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत रामायण गुरुवारी (दि. 14) सुधीर फडके यांचे सुपुत्र, गायक-संगीतकार श्रीधर फडके सादर करणार आहेत. गीतरामायणाचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तर शुक्रवारी (दि. 15) ‌‘बाबूजी आणि मी’ हा संवादात्मक ते कार्यक्रम सादर करणार आहेत.
1974 साली मंडळाची स्थापना झाली असून केवळ उत्सवी कार्यक्रम न घेता मंडळाने आजपर्यंत मुख्यत्वे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांवर भर दिला आहे. उत्सव सर्वदृष्टीने प्रदुषणमुक्त असावा या दृष्टीने मंडळाची वाटचाल सुरू आहे. येथे गणेशोत्सवात कर्णकर्शश गाणी लावली जात नाहीत तसेच गेल्या 20 वर्षांपासून गुलाल उधळणे बंद केले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोलपथकाचा सहभाग असतो, असे मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांगितले.
मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात भागवत सप्ताहाने झाली असल्याने अध्यात्मावर आधारित देखावा असावा असा निर्णय मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चर्चेद्वारे घेतला. मातीकामातील भव्य असा 40 बाय 12 फूट आकारातील देखावा या वर्षी उभारण्यात आला आहे, असे मंडळाचे सेक्रेटरी विनय कुलकर्णी यांनी सांगितले.
मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाचे विश्वस्त प्रसिद्ध गायक राजेश दातार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंडळातर्फे महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाते. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यदायी खाद्यपदार्थ या संकल्पनेवर ही स्पर्धा घेण्यात आली. ज्ञानेश्री गिजरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पूनम ओसवाल द्वितीय तर जुई नागपूरे तृतीय आल्या. स्पर्धेचे परीक्षण पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी केले. पाककलेत कुशल महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सरपोतदार यांनी या प्रसंगी दिली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नितीन पाटील, श्रुती नाझिरकर, गायत्री मोघे, सोहम जोशी, राधिका दातार, अमर दबडे, राजेश दातार यांनी सहकार्य केले.

मंडळाचा यंदाचा दहीहंडी उपक्रमही लक्षवेधी ठरला. दोन ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी चॉकलेटची दहीहंडी साकारण्यात आली होती. मुलांमध्ये शर्व गोळे याने तर मुलींमध्ये रुजुता पुरकर हिने दहीहंडी फोडत पारितोषिक पटकाविले. पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या दहीकाल्याचा यावेळी मुलांनी आनंद लुटला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन पाटील, विजय ममदापूरकर, रोहन पूरकर, अमित कुलकर्णी, मदन कटारिया, सुयश साबडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: