पुण्याचे पॅड मॅन योगेश पवार यांच्या कडून काश्मिर मध्ये सीमेलगतच्या गावांमध्ये मासिक पाळी बाबत जनजागृती
पुणे :पुण्याचे पॅड मॅन अशी ओळख असलेले योगेश पवार आपल्या कशिश सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य विषयक जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. नुकतेच त्यांनी काश्मिर खोऱ्यात जाऊन भारत – पाकिस्तान सीमेलगतच्या केरन, टिटवाल, तंगधार, मच्छल गावांमध्ये घरोघरी जाऊन महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती केली आणि १० हजार सॅनेटरी नॅप्किन्स चे वाटप केले.
पुण्याचे ‘पॅड मॅन’ योगेश पवार यांनी आजपर्यंत महिलांच्या आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवले आहेत. मागील काही दिवसांमध्ये त्यांनी पुणे, सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिलांमध्ये मासिक पाळी आणि त्या दारम्यानची स्वच्छता या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे, त्या अंतर्गत पवार यांनी एक लाखांहून अधिक सॅनेटरी नॅप्किन्स चे वाटप करत आहेत. मासिक पाळी विषयी समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पवार यांनी महाराष्ट्रासह देशभर मोहीम राबविण्याचा मानस व्यक्त केला असून त्या अंतर्गत त्यांनी पुण्यातून काश्मीर मध्ये जाऊन भारत – पाक सीमेलगतच्या दुर्गम गावांमध्ये १० हजार सॅनेटरी नॅप्किन्स चे वाटप केले आहे.
काश्मिर खोऱ्यात १० हजार सॅनेटरी नॅप्किन्स वाटप करण्याच्या उपक्रमात ‘पॅड मॅन’ योगेश पवार यांच्यासह आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, काफिला फाउंडेशनचे इश्पाक भट,चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, रोहित सुनील गोडबोले सहभागी झाले होते. पवार यांना या उपक्रमांसाठी काश्मीर खोऱ्यातील काफिला फाऊंडेशन,आम्ही पुणेकर,भारतीय लष्कराच्या ४१ आर आर बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. एस. नवलगट्टी,टाऊन कमांडर मेजर अमित माने,राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर,भारतीय जनता पार्टी चे सचिन दांगट,अनंत दांगट,वर्षा पार्टे,डॉ. कविता कांबळे,डॉ. वैष्णवी शेटे,दिप्ती सिंघ,चिन्मय गुटाळ ,सुनील जोगळे,डॉ. माधुरी खानझोडे,डॉ. पूजा भंडारे, अक्षय लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमांबद्दल बोलताना पुण्याचे ‘पॅड मॅन’ योगेश पवार म्हणाले,भारत पाकिस्तान बॉर्डर जवळ घरो घरी जाऊन एका गोष्टीची प्रचिती झाली की खरंच अनेक महिलांना आरोग्य विषयक जनजागृतीची गरज आहे. ज्या भागात मोबाईल सुद्धा नाही चालत अश्या ठिकाणी ह्या पुढे सुद्धा पुढाकार घेऊन मी नेहमीच आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
या उपक्रमाला विशेष सहकार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले,आपल्या पुण्यातून भारत पाकिस्तान बॉर्डर ला जाऊन महिलांसाठी उपक्रम राबवणे ही एक कौतुकास्पद बाब आहे. अश्या संवेदनशील भागात घरो घरी सॅनेटरी नॅप्किन्स वाटून योगेश पवार ने आपल्या पुण्याचे नाव लौकिक वाढविले आहे.
या उपक्रमाला शुभेच्छा देताना पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ म्हणाले, योगेश पवार यांचे कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नासाठी जनजागृती, प्रबोधन आणि प्रत्यक्ष कृती असे कार्य सुरू आहे. त्यांनी शहरातील वस्ती, झोपडपट्टी भागांपासून, दुर्गम गांवांपर्यंत सॅनेटरी नॅप्किन्स बद्दल जनजागृती आणि मोफत वाटप कार्य सुरू केले आहे हे कौतुकास्पद काम आहे, काश्मिर मध्येही त्यांनी १० हजार सॅनेटरी नॅप्किन्स चे वाटप नुकतेच केले योगेश पवार यांचे कार्य वाखण्याजोगे आहे.