fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsMAHARASHTRA

भारतात ज्यांना कल्चरल प्रिव्हीलेज मिळाले आहे त्यांनी कल्चरल सुसाईड बॉम्बर व्हायला हवं.- डॉ. सुरज एंगडे

कोल्हापूर : भारतातल्या आरक्षणाला नावं ठेवत पाश्चात्य देशात जाणारी मुलं-मुली तिथे मात्र भारतीय असण्याच्या आरक्षणाचे फायदे घेतात. आपल्याकडे आरक्षण म्हटलं की क्लास मोबीलाईझेशन असा समज आहे. कास्टमध्ये रिसोर्स मोनोपॉली असते. इलेक्ट्रॉल डेमोक्रॅसी ही आपल्याकडे डेमोक्रॅसी म्हणून विकली जाते. ते खरे नाही, असेही ते म्हणाले. ‘रक्ताची पवित्रता’ ही चुकीची संकल्पना आहे, असं प्रचलित व्हायला पाहिजे,असंही ते म्हणाले. आपण आपल्याकडील समाजाकडे धर्माच्या चौकटीतून पाहतो. तसे न करता आपण त्या व्यतिरिक्त आसपासच्या गोष्टीही तपासायला हव्यात. मेरिका तसेच युरोपीय राष्ट्र आणि भारतातील जातीय उतरंडीवर बोलताना जसे की अमेरिकेत ब्लॅक चळवळीसाठी अगदी स्वतःचा जीवही देणारे कल्चरल सुसाईड बॉम्बर आपल्याला दिसून येतात. तसेच भारतात ज्यांना कल्चरल प्रिव्हीलेज मिळाले आहे त्यांनी कल्चरल सुसाईड बॉम्बर व्हायला हवं. ज्या गोष्टी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटत नाहीत त्यांचा विरोध करायला हवा. प्रत्येक समाजाचा एक सोशल आर्काइव्ह असतो तो अभ्यासायला हवा, असे मत डॉ. सुरज मिलिंद एंगडे यांनी व्यक्त केले.

बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या राजवटीत अनेक पुरोगामी धोरणे राबविणारे, खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जाणारे, आपल्या राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम करणारे आणि जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. २६ जून २०२३ रोजी त्यांच्या १५० व्या जयंती वर्षाची सुरूवात झाली आहे. या निमित्ताने ‘आरक्षणाविषयीचे गैरसमज आणि पूर्वग्रह’ या विषयावर संवाद साधण्यासाठी आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज डॉ. सुरज मिलिंद एंगडे कोल्हापूरकरांच्या भेटीला आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बालपणापासूनच अंधाऱ्या आयुष्याशी झटून आकादमिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत हार्वर्ड विद्यापीठापर्यंत पोहोचणारे डॉ. सुरज मिलिंद एंगडे. त्यांनी त्यांच्या ‘कास्ट मॅटर्स’ या पुस्तकात विषमतामूलक व्यवस्थेवर परखडपणे लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद २०२१ मध्ये ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’तर्फे प्रकाशित झालाय. अलीकडेच याची तिसरी आवृत्तीही आली आहे. तर या निमित्ताने गुरुवारी  शाहू स्मारक भवन, येथे या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक अखिल मेहता व साहिल मेहता उपस्थित होते.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा मुलाखतीचा कार्यक्रम म्हणजे माझ्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीसाठीचा सर्वात मोठा सम्मान आहे, कारण आजची मुलाखत कुमार केतकर घेत आहेत, असे प्रतिपादन डॉ सुरज यांनी केले. माझ्या कॉलेजच्या दिवसांत केतकर यांचं संपादकीय वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नसे, असे सुरज एंगडे म्हणाले.
आपल्या विचारांवरील पगड्याबद्दलच्या प्रश्नासंदर्भात बोलताना वडील नांदेडच्या सांस्कृतिक चळवळीत आणि दलित पँथर मध्ये होते. त्याचाच प्रभाव माझ्यावरही पडला, असे ते म्हणाले. तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगवेगळ्या चळवळींशी ओळख झाली तिथल्या खाण कामगारांच्या चळवळीतुन ती जाणीव प्रखर झाली, असंही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की ‘आंबेडकर उजव्यांच्या मांडीवर बसणार नाहीत . मध्य धारेतले लोकं त्यांना स्वीकारणार नाहीत. त्यामुळे ते स्वाभाविकपणे वा नैसर्गिकपणे डावेच आहेत. पण आपल्याकडच्या डाव्यांच्या चळवळीत कास्ट आणि क्लास solidarity आली नाही. उच्चवर्णीयांचा तिथे दबदबा राहिला आहे. बाहेरच्या जगात जरी Positive discrimination , affirmative action , economic programs अशी वेगवेगळी नावं असली तरी पण त्याचा अर्थ आरक्षण हाच आहे.

समता प्रस्थापित करण्याच्या स्वप्नांच्या आड आलेल्या अडथळ्यांमुळे आलेल्या नैराश्यातून लोकमान्य टिळकांचा मुलगा श्रीधरपंतांनी आत्महत्या केली होती. ही आठवण कुमार केतकर यांनी यावेळी सांगितली. विचारांच्या दैवीकरणामुळे आपल्या समस्यांचं गाऱ्हाणं आपण सरकारकडे न करता देवाकडे करतो. मंदिरात देवासाठी कुणीही जात नाही. प्रत्येकजण काहीतरी मागायलाच जातो. त्यामुळे या सर्व गोष्टींना जातीच्या दृष्टिकोनातून अभ्यासलं पाहिजे.
मध्यमवर्गाविषयी बोलताना, मध्यमवर्ग व्यवस्थेत इतका गुरफटला आहे की आपण बदल घडवून आणू शकतो हेच तो विसरून चालला आहे. खालच्या वर्गाची आंदोलने आणि चळवळींमुळेच आज मध्यमवर्ग नीटनेटकं जीवन जगतो आहे असे प्रतिपादन शेवटी त्यांनी केले.

आपल्या प्रास्ताविकात पुस्तकाविषयी बोलताना हे पुस्तक बेस्टसेलर असल्याचं प्रतिपादन ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे संचालक अखिल मेहता यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अरुण नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

%d