गुणवत्तेचाच्या सन्मानासाठी शिक्षण पध्दतीत बदल आवश्यक – डॉ. दीपक फाटक
पिंपरी : भारतीयांमध्ये तरुणांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. या गुणवत्तेचा योग्य वापर करायचा असेल तर आपल्या शिक्षण पध्दतीत बदल आवश्यक आहे. केवळ साचेबद्ध अभ्यासक्रमांना महत्त्व न देता, व्यवसायिक, कृतिशील अभ्यासक्रमांची आखणी केली पाहिजे. तरच या बौध्दिक, कृतिशील ज्ञान संपदेचा उपयोग देशाच्या वेगवान विकासासाठी होईल, असे परखड मत आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. दीपक फाटक यांनी व्यक्त केले.
पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात सातवी ‘आयसीसीयुबीईए – २३’ आणि दुसरी ‘आयमेस – २३’ या अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित दोन आंतरराष्ट्रीय परिषदांच्या समारोप प्रसंगी डॉ. फाटक बोलत होते. यावेळी कॅपजेमिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेट्ये, हेन्कल अढेसिव्हचे निलेश आडकर, आयईईई पुणेचे मंदार खुरजेकर, डॉ. अभिजित खूरपे, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, विविध विद्या शाखेचे प्रमुख, प्राध्यापक, विविध महाविद्यालय, कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. फाटक म्हणाले, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, आयटी अभियांत्रिकीची अशी विभागणी आहे. गुणवत्ता पूर्ण अभियंते तयार करण्यासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात या सर्व विषयांचा एकत्रित समावेश केला तर उत्तम, उच्च दर्जाचे अभियंते घडतील. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा. विषय नीट समजून घ्या. आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच कार्यरत राहून ज्ञानसंचय जमा करा.
जगाला पुढे घेऊन जाण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन गरजेचे आहे. पीसीसीओई ने आयोजित केलेली संशोधन परिषद कौतुकास्पद आहे. शैक्षणिक आणि औद्योगिक संस्था यांनी एकत्रितपणे संशोधन करणे गरजेचे आहे, असे प्रसाद शेट्ये यांनी सांगितले.
निलेश आडकर, मंदार खुरजेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. राजेश फुरसुले, डॉ. संजय माटेकर यांनी परिषदेचा आढावा घेतला. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या ‘आयसीसीयुबीईए – २४’ आणि ‘आयमेस- २४’ परिषदेची सूत्र मावळते संयोजक डॉ. किशोर किनगे, डॉ. अजय गायकवाड यांच्याकडून डॉ. रोशनी राऊत, डॉ. प्रवीण काळे यांनी स्वीकारली.
तत्पूर्वीच्या सत्रात आयआयटी मुंबईच्या डॉ. मायरम शोजेल यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी चर्चा सत्रात सहभाग घेतला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा. अंजली श्रीवास्तव, प्रा. प्रफुल शिनकर यांनी केले. डॉ. अजय गायकवाड यांनी आभार मानले.