fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

डॉग ऑन व्हील्स: मिलाप, इनाली साहस देत आहे विकलांग कुत्र्यांना आयुष्याची दुसरी संधी

पुणे : मिलाप या भारतातील महत्त्वपूर्ण क्राउडफण्डिंग प्लॅटफॉर्मने शहरातील वाचवण्यात आलेल्या व जखमी कुत्र्यांसाठी आंतरराष्ट्रीय श्वान दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इनाली फाउंडेशनची पीएडब्ल्यूएस नावाची, प्रोस्थेटिक अवयवांद्वारे आयुष्य सुधारण्याप्रती समर्पित शाखा, साहस फॉर अॅनिमल फाउंडेशनच्या साथीने प्राण्यांच्या बचावावर लक्ष केंद्रित करते. विकलांग तसेच पक्षाघात झालेल्या कुत्र्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या व्हीलचेअर्सचे वितरण करणाऱ्या उपक्रमात या संस्थाही सहभागी झाल्या होत्या.

जखमी कुत्र्यांना दत्तक घेणे तसेच रस्त्यावरील भटक्या प्राण्यांबाबत अनुकंपा जागवणे, सहानुभूती जोपासणे ही या कार्यक्रमाची उद्दिष्टे होती. व्हीलचेअर्स पुरवून या कुत्र्यांना सक्षम करण्याच्या माध्यमातून, मिलापने प्राण्यांप्रती दयाळू भावाचे महत्त्व अधोरेखित केले. या प्राण्यांनी दाखवलेला कधीही हार न मानण्याचा’ निर्धार आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या स्थितीस्थापकत्वाचे उदाहरण आहे.

मिलापचे अध्यक्ष व सहसंस्थापक अनोज विश्वनाथन म्हणाले, जायबंदी कुत्र्यांना नव्याने आयुष्य सुरू करण्यात मदत करणाऱ्या लक्षणीय प्रयत्नाचे नेतृत्व करणे आमच्यासाठी खास अनुभव होता. आंतरराष्ट्रीय श्वान दिवस निमित्ताने व्हीलचेअर्सचे वितरण करून आम्ही केवळ या उमद्या श्वानांसाठी लाभदायी ठरणारा नव्हे, तर सर्वांच्या हृदयाला स्पर्श करणारा सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याप्रती आमचे समर्पण दाखवून दिले आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना मला खूप आनंद होत आहे. हा उपक्रम अवयव गमावलेल्या प्राण्यांसाठी तर लाभदायी ठरत आहेच, शिवाय समाजाच्या या भागाकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे याकडेही अशा उपक्रमांद्वारे लक्ष वेधले जाते. कारण प्राण्यांकडे लक्ष देणे, त्यांची नीट काळजी हे देखील आवश्यक आहे. इनाली व पीएडब्ल्यूएसचे हेच उद्दिष्ट आहे. याद्वारे आम्ही प्राण्यांच्या सुरक्षिततेची व कल्याणाची काळजी घेतो. ही पृथ्वी सर्वांसाठी आहे, केवळ मानवांसाठी नाही असे मला वाटते. म्हणूनच हे जग सर्व सजीवांसाठी आनंदाची जागा ठरेल असे काहीतरी आपण केले पाहिजे. या गोंडस आणि प्रेमळ प्राण्यांना व्हीलचेअर्स देऊन आपण त्यांची अडचण दूर केली पाहिजे,असे इनाली फाउंडेशन या कमी खर्चात प्रोस्थेटिक अवयव पुरवणाऱ्या ना-नफा तत्त्वावरील संस्थेचे संस्थापक प्रशांत गाडे म्हणाले.

अनेक कुत्र्यांना अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांचे मालक वाऱ्यावर सोडून देतात, तर काही आधीपासूनच भटक्या असलेल्या कुत्र्यांना दु:खद रस्ते अपघातात सापडल्यामुळे विकलांगता येते.सुदैवाने या प्राण्यांना दयाळू प्राणीमित्रांमुळे दिलासा मिळतो. प्रत्येक कुत्र्याची वेगळी गरज पूर्ण करण्यासाठी या व्हीलचेअर्स खास तयार करण्यात आल्या आहेत. त्यांची घडण परिश्रमपूर्वक करण्यात आली आहे आणि त्या हलवण्यासाठी सोप्या आहेत.

या कामासाठी वेगवेगळ्या संस्था एकत्र येत आहेत हे बघून मला अतीव आनंद होत आहे. पक्षाघात झालेल्या कुत्र्यांची संख्याही खूप मोठी आहे आणि आजुबाजूला अन्य कुत्र्यांना खेळताना बघून त्यांना अनेकदा दुर्लक्षित वाटते. मात्र, चाके त्यांच्या आयुष्यात आशा व आनंद परत आणू शकतात. माणसांना जसा आरामात जगण्याचा हक्क आहे तसाच तो कुत्र्यांनाही आहे आणि सर्व प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल असा भविष्यकाळ आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असा संदेश मला आंतरराष्ट्रीय श्वान दिनाच्या निमित्ताने सर्वांना द्यायचा आहे, असे साहस फॉर अॅनिमिल्स फाउंडेशनच्या संस्थापक गीतांजली तौर म्हणाल्या.

व्हीलचेअर्स मिळाल्यामुळे उत्साह वाढलेल्या या चार पायांच्या मित्रांना रिफ्लेक्टिव डॉग कॉलर्स तसेच त्यांची सुरक्षितता वाढवणाऱ्या अन्य वस्तूंनीही सुसज्ज करण्यात आले.

इनाली फाउंडेशन ही एक ना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था असून, अपघातात अवयव गमावलेल्या किंवा जन्मत:च एखादा अवयव नसलेल्या व्यक्ती व प्राण्यांना किफायतशीर अवयव प्रोस्थेटिक्स पुरवते. तर साहस फॉर अॅनिमल फाउंडेशन ही एक प्राणी कल्याण संस्था तसेच बचाव केंद्र आहे. प्राण्यांना वाचवण्याचे उपक्रम, उपचार, प्राणी दत्तक देणे आणि अनेकविध प्राणी कल्याण उपक्रमांमध्ये ही संस्था सहभागी आहे.

मिलाप ही संस्था प्राण्यांना मदत करण्यात अग्रेसर आहे. विकलांग प्राण्यासाठी प्रोस्थेटिक्स व व्हीलचेअर्सच्या संपादनात संस्था मदत करते. क्राउडफण्डिंग तसेच वापरकर्ते, दाते व लाभार्थींना या विशेष सजिवांच्या आयुष्यांवर अर्थपूर्ण प्रभाव टाकण्यास सक्षम करण्यासाठी एक विश्वासार्ह नाव म्हणून या प्लॅटफॉर्मची ओळख आहे. आजच्या तारखेपर्यंत मिलाप प्लॅटफॉर्मच्या प्राण्यांना समर्पित अशा ३,३०० हून अधिक अभियानांमधून १५ कोटी रुपयांचा निधी उभा राहिला आहे.

Leave a Reply

%d