ठाकरेंना धक्का; सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई : ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आणखी एक मोठा धक्का दिला. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी आज शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभारल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार त्यांच्या सोबत गेले होते. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव धनुष्य-बाण हे चिन्हे देऊ केले आहे. या धक्क्यातून उद्धव ठाकरे सावरत असताना महाविकास आघाडीला पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाल्याने ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला होता. आता तरी पक्षाला लागलेली गळती थांबेल, असे त्यांना वाटत होते; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज हा पक्ष प्रवेश झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूषण देसाई यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आम्ही स्थापन केले आहे. त्यांची भूमिका आणि विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करीत आहोत त्यामुळे या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील, तालुक्यांतील कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ५० आमदार आणि १३ खासदार सोबत आले होते. हजारो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर काम करू लागले आहेत. या पुढेही हा प्रवाह सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुभाष देसाई यांनी एक पत्रक काढून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील ५ दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरू ठेवणार आहे.