सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी आता हक्काचे व्यासपीठ
‘एसपीपीयू अल्युमिनाय असोसिएशन’ च्या संकेतस्थळाचे उदघाटन
पुणे : सावित्राईबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना आता हक्काचे व्यासपीठ मिळाले असून त्या माध्यमातून आता त्यांचे कायमस्वरूपी नाते आता विद्यापीठाशी जोडले जाणार आहे. ‘एसपीपीयू अल्युमिनाय असोसिएशन’ च्या संकेतस्थळाचे उदघाटन १३ मे रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, असोसिएशनचे संचालक ऍड.एस.के. जैन, डॉ. संजय ढोले, असोसिएशनचे सल्लागार समितीचे सदस्य कृष्णकुमार गोयल, डॉ. सुप्रिया पाटील, संपर्क प्रमुख म्हणून प्रतीक दामा आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना डॉ. करमळकर म्हणाले, हे संकेतस्थळ झाल्यामुळे त्यावर सर्व माजी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. तसेच यामुळे देशापरदेशात असणारे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विद्यापीठाशी कायमस्वरूपी जोडले जातील.
राजेश पांडे म्हणाले, या संकेतस्थळाच्या माध्यमातून भविष्यात विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही मदत होईल. तसेच भविष्यात अनेक कार्यक्रमही या व्यासपीठाच्या माध्यमातून होतील.
असोसिएशनची पुढील वाटचाल व नियोजन याबाबत ऍड. एस.के. जैन आणि कृष्णकुमार गोयल यांनी बैठकीत अनेक विषय सुचवले. यावेळी समन्वयक विक्रमादित्य राठोड यांनी आभार मानले.