सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी ‘नॅनो हर्बल कवच’
विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाऊंडेशन आणि कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाची निर्मिती
पुणे : सार्वजनिक ठिकाणी रोगांच्या प्रदूर्भावापासून सामान्य लोकांचे रक्षण करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू रिसर्च पार्क फाऊंडेशनच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटर आणि कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी (कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ) यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो हर्बल कवच’ हे उत्पादन तयार करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते या नॅनो हर्बल कवच’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ.दिनेश अगरवाल आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शाळीग्राम म्हणाले, रुग्णालये, मॉल्स, विमानतळ, बस स्टँड, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्टेअर ग्रिल, एस्केलेटर आणि ट्रॉली हँडल स्वच्छ करण्यासाठी साहित्याची कमतरता, तसेच कामगारांची कमतरता आणि वेळेच्या अभावामुळे स्वच्छता प्रक्रिया कठीण होते. शिवाय सार्वजनिक ठिकाणी वारंवार स्पर्श होणाऱ्या ठिकाणी कापड, स्पॉंज आणि नॅपकिन्सच्या साहाय्याने स्वच्छता तर होते पण निर्जंतुकीकरण होत नाही. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी हे नॅनो हर्बल कवच सारख्या उत्पादनाची निर्मिती आम्ही केली आहे.
डॉ. अगरवाल म्हणाले, हे एक जंतुनाशक उत्पादन आहे आणि सर्व प्रकारच्या जंतूंपासून ५ तासांपर्यंत संरक्षण करते. क्लिनिंग पॉड ग्रिलच्या विविध आयामांमध्ये बसू शकते आणि नॅनो हर्बल फॉर्म्युलेशनचा हलका थर ग्रिलच्या पृष्ठभागांवरती राहतो.
विद्यापीठातील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. जयंत पवार आणि फाउंडेशनच्या डॉ. पूजा दोशी यांनी यात योगदान दिले आहे.
संशोधक व संशोधनाला व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न
अनेकदा ग्रामीण पातळीवर अत्यंत चांगल्या आणि गरजेच्या विषयावर संशोधन, नवनिर्मिती होत असते. एसपीपीयू रिसर्च पार्क फाऊंडेशनच्या माध्यमातून असे संशोधक व संशोधनाला व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच नवीन प्रयोग करण्यासाठी डिझाईन इनोव्हेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करून नवसंशोधनात भर घालायला हवी.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)