fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे ‘फिनटेक’ गुंतवणूकीत आघाडीवर

पुणे,:पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात फिनटेक म्हणजेच आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक होत असून पुढच्या दहा वर्षात पुण्यात भारतातील फिनटेक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असेल असे मत ‘झेस्ट मनी’ या कंपनीच्या सहसंस्थापक लिझी चॅपमन यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभाग आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील स्टार्टअप आणि इंक्युबेटरसाठी ९ व १० मे रोजी क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ येथे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन इनोव्हेशन सेलच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, मोहित सायिनी, स्टार्टअप इंडियाच्या सहाय्यक उपाध्यक्ष पलक भाटिया, उद्देश गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

लिझी चॅपमन म्हणाल्या, “मला यूके लंडनमध्ये फिनटेक स्टार्टअप स्थापित करण्याची संधी मिळाली जी आर्थिक राजधानी आहे परंतु माझ्या स्टार्टअपद्वारे मोठ्या संख्येने लोकांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी मी भारताची निवड केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून बँकांना ग्राहकांशी जोडू शकतील अशा अनेक फिनटेक उत्पादनांची भारताला आवश्यकता आहे. लिझी चॅपमनने यांनी ६ स्टार्टअपला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे सीईओ डॉ दीपेंद्रसिंह खुशवाह यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे स्टार्टअप्समध्ये योगदान देणारे महत्त्वाचे राज्य आहे आणि आपल्याकडे राज्यात सर्वाधिक स्टार्टअप्स आहेत. सोसायटीकडून यासाठी बीजभांडवल लवकरच देण्यात येईल.

राज्यभरातून ५० इनक्युबेशन सेंटरचे सीईओ या कार्यक्रमाला उपस्थित होते

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही
एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन, इनोव्हेशन सेल ही व्यासपीठे स्टार्टअपसाठी उपलब्ध करून दिली आहेत. केवळ एवढ्यावर न थांबता याचा इंडस्ट्रीशी संबंध जोडत औद्योगिक आणि सामाजिक प्रश्नांवर काम कसे करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीसारख्या संस्थांशी जोडून ही वीण अधिक चांगली करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading