fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

खानवडीच्या आदर्श निवासी शाळेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही-अजित पवार

पुणे : महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ३० कोटी खर्च करून खानवडी येथे मुलींची आदर्श शाळा उभारण्यात येत आहे. या शाळेत ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थीनींसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून आदर्श शाळेसाठी कुठल्याहीप्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात येणाऱ्या ज्योती-सावित्री आंतरराष्ट्रीय शाळेच्या आणि महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, फियाट उद्योगाचे राकेश बावेजा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, सरपंच स्वप्नाली होले, महात्मा फुले स्मारक समितीचे सुदाम इंगळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींचा विचार घेऊन आपण पुढे जायला हवे. यावर्षी ९६ कोटी रुपये शाळा सुधार कार्यक्रमासाठी देण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील ४१० शाळांमध्ये दर्जेदार सुविधा देण्यात येणार असून त्यात जिल्ह्यातील ४० टक्के विद्यार्थी कार्यक्रमात समाविष्ट होत आहे. टप्प्याटप्प्याने इतरही शाळांमधून हा कार्यक्रम राबविण्यात येईल.

पुरंदरच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, अर्थसंकल्पात जेजुरी आणि परिसराच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यासाठीही १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या वडू बुद्रुक येथील स्मारकासाठी २५० कोटी, पुरंदर रिंगरोडच्या जमीन संपादनासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

खासदार सुळे म्हणाल्या, मराठीचा अभिमान बाळगताना इंग्रजीतून शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शिक्षणात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासोबत शाळेतील सुविधांबाबत ग्रामस्थांचेही सहकार्य गरजेचे आहे. पुरंदरची ओळख चांगल्या शिक्षक आणि फळांसाठी आहे. इथे फळप्रक्रिया व्यवसाय विकसीत होत आहे. तालुक्याला जोडणाऱ्या वाहतूक सुविधा वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. उत्तम प्रशासकीय इमारती उभ्या रहात आहेत. तालुक्यातील स्वच्छतेवर अधिक भर देण्याची गरज आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading